दोडामार्ग | प्रतिनिधी
ग्रामपंचायत हा खऱ्या अर्थाने ग्रामविकासाचा केंद्रबिंदू आहे. आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीने आपल्या दर्जेदार विकासकामांतून जिल्ह्यासह राज्यभरात नावलौकिक मिळवला आहे. नूतन ग्रामपंचायत कार्यालयासोबतच तालुक्यातील पहिले ‘महिला भवन’ उभारण्याचा केलेला पराक्रम खरोखरच गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि महिला भवनाचा लोकार्पण सोहळा मनीष दळवी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
हत्तींच्या उपद्रवावर प्राणीमित्रांविषयी खेद
आपल्या भाषणात मनीष दळवी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांनाही वाचा फोडली. ते म्हणाले, “दोडामार्ग तालुक्यात वन्य प्राण्यांचा, विशेषतः हत्तींचा उपद्रव मोठा आहे. सध्या हेवाळे परिसरात सात हत्तींचा कळप शेती-बागायतीचे मोठे नुकसान करत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हत्ती पकडण्याची मोहीम आखली होती, मात्र प्राणीमित्रांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे ही मोहीम बारगळली. आयुष्यभर कष्टाने उभी केलेली बागायती नष्ट होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, पण त्याचे सोयरसुतक प्राणीमित्रांना नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महायुतीला साथ देण्याचे आवाहन
यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस महेश सारंग यांनी दोडामार्ग तालुक्याने नेहमीच महायुतीला खंबीर साथ दिल्याचे नमूद केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही हीच साथ कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. माजी जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी महिला भवन उभारण्याच्या संकल्पनेचे विशेष कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला व्यासपीठावर नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सरपंच सौ. साक्षी देसाई, उपसरपंच सौ. वैशाली गवस, माजी सरपंच संदीप देसाई, समीर देसाई, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, रामदास मेस्त्री, भगवान गवस, शेटकर, गोपाळ गवस आदी उपस्थित होते.
कृतज्ञता सोहळा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच सौ. साक्षी देसाई यांनी प्रास्ताविक केले. गावातील सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा विकास शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच, तिन्ही गावांतील पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत गवस यांनी केले.













