बांदा : प्रतिनिधी
ओंकार फाउंडेशनच्या माध्यमातून वाफोली–विलवडे परिसरातील ग्रामस्थांनी क्वारी व क्रशर प्रकल्प विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गाव उध्वस्त करणाऱ्या या प्रकल्प विरोधात ठोस लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीला दोन्ही गावांतील बाधित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सर्वानुमते विनीत गवस यांची कृती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकी दरम्यान विलवडे गावातील शेतीला निर्माण झालेला धोका, तसेच वाफोली व विलवडे या दोन्ही गावांतील घरांमध्ये ब्लास्टिंगमुळे पडलेले तडे याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांचे जीवन असुरक्षित बनले असून शेती, बागायती व उदरनिर्वाहाचे साधन धोक्यात आले आहे.
प्रचंड धूळ, सातत्याने होणारे ब्लास्टिंग आणि त्याचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम यामुळे येथील पशु–पक्ष्यांचे अस्तित्वही संकटात आले आहे. नैसर्गिक झरे आटत चालले असून वाफोली धरणालाही तडे जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. या सर्व बाबी लक्षात घेता वाफोली–विलवडे परिसरातील सुरू असलेले क्वारी व क्रशर प्रकल्प बंद करण्याचा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीला राजाराम दळवी, सायमन गोंसाल्विस, सत्यवान सावंत, विनीत गवस, सुनील सावंत, आकाश सावंत, राजू सावंत, सागर कोठावले, शैलेश गवस, लक्ष्मी गवस, वाफोली ग्रामपंचायत सदस्या सौ. गौरी गवस, नितीन गवस यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करत लवकरच हे क्वारी व क्रशर प्रकल्प बंद पडतील, असे आश्वासन दिले.











