रुळावर अडकलेल्या ऑटोमुळे रेल्वे वाहतुकीत तात्पुरता अडथळा
एक तासाच्या विलंबानंतर वंदे भारतचा प्रवास पुन्हा सुरू
केरळमधील तिरुवनंतपुरमजवळ वंदे भारत एक्सप्रेसला उलटलेल्या ऑटोरिक्षाची धडक बसल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ऑटोरिक्षात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. लोको पायलटने प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, एक तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आणत रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली.
तिरुवनंतपुरम : मंगळवार (२३ डिसेंबर २०२५) रोजी रात्री कासारगोडहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने वर्कला परिसरातील अकाथमुरी रेल्वे स्थानकाजवळ रुळावर उलटलेल्या ऑटोरिक्षाला धडक दिली. धडकेनंतर ट्रेनने ती तीनचाकी काही मीटरपर्यंत फरफटत नेली. मात्र, त्या वेळी ऑटोरिक्षात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 20633 कासारगोड–तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस रात्री सुमारे १०.१० वाजता वर्कला–कडक्कावूर सेक्शनमधील अकाथमुरी हॉल्ट स्टेशनजवळ येत असताना रुळावर वाहन दिसले. ही बाब लक्षात येताच लोको पायलटने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावले, तरीही ट्रेनची ऑटोरिक्षाला धडक झाली.
प्राथमिक तपासात संबंधित ऑटोरिक्षा विनापरवाना असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, ही घटना तोडफोडीची नसल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ऑटोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत चालकाने कबुली दिली की, हॉल्ट स्टेशनच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटो रुळावर पलटी झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दल (RPF), अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित ऑटोरिक्षा रुळावरून हटवली. या घटनेत ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
ऑपरेशन्स पुन्हा सुरू — या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे एक तासाच्या विलंबानंतर वंदे भारत एक्सप्रेसने रात्री ११.१५ वाजता आपला प्रवास पुन्हा सुरू केला. ट्रॅक पूर्णपणे मोकळा केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
ही ट्रेन रात्री ११.५० वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनवर पोहोचली. किरकोळ दुरुस्ती आणि तपासणीनंतर बुधवारी (२४ डिसेंबर २०२५) सकाळी वंदे भारत एक्सप्रेसने परतीचा प्रवास सुरू केला, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.











