सावंतवाडी शहरातील एक स्मशानभूमी बनलीय चक्क अंमली पदार्थांचा अड्डा

सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांच्याकडून ‘स्पॉट पंचनामा’

पोलीसांचा डोळेझाक होत असल्याचा गंभीर आरोप

सावंतवाडी । प्रतिनिधी : शहरातील एक स्मशानभूमी चक्क दारू व अंमली पदार्थ सेवनाचा अड्डा बनली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी केला आहे. आज थेट स्मशानभूमीत जात त्यांनी इन कॅमेरा ही गंभीर बाब उघडकीस आणली असून पोलिस प्रशासन झोपलय का, असा सवाल केला आहे. येथील उपरलकर स्मशानभूमी समोरील एका स्मशान भूमीच्या इमारतीत जात तोरसकर यांनी हा पंचनामा केला.

यावेळी ते म्हणाले, उपरलकर स्मशानभूमी समोरील दफन स्मशानभूमीच्या जागेत विधी करण्याच्या इमारतीत युवक उघडपणे दारू व अन्य अंमली पदार्थांचं सेवन करतात. आज प्रत्यक्ष घटनास्थळी १०-१२ युवक दारूच सेवन करत असल्याचे कळताच त्यांनी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन हा प्रकार रोखत संबंधितांना तंबी दिली. शहरातील नवीन पिढी व्यसनाधीन होत असून अवैध गोष्टींना कुणी विरोध करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, आम्ही यासाठी पुढाकार घेऊ. आम्ही यावर बोलत राहू अन्यायाला वाचा फोडू, जनता आमच्यासोबतही आहे. प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आणत राहू असा इशारा त्यांनी दिला.

नगरपंचायत कर्मचारी मारूती निरवडेकर तिथे प्रामाणिक सेवा देत असताना त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत सावंतवाडीकरांनी असे प्रकार खपवून घेऊ नये, सावंतवाडीचा सजक नागरिक म्हणून मी या गोष्टी उघड करेन, असा इशारा त्यांनी दिला.