सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. या विजयाबद्दल ‘सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ’ (शाखा सावंतवाडी) यांच्या वतीने निरवडेकर दाम्पत्याचा जंगी सत्कार करण्यात आला.
ॲड. निरवडेकर यांनी ९५९ मते मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेणारे उमेदवार ठरण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ६२९ मतांची मोठी आघाडी घेतली. या विजयानिमित्त चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने ॲड. अनिल निरवडेकर व त्यांच्या पत्नी सौ. अनघा निरवडेकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ॲड. निरवडेकर भावूक झाले होते.
ते म्हणाले की, “गेल्या २८ वर्षांपासून मी या क्षणाची वाट पाहत होतो. मतदारांनी आणि विशेषतः समाज बांधवांनी दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी अनमोल आहे. माणसाने कधी थांबावे हे त्याला समजले पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला. तसेच, नगरपरिषदेत समाज बांधवांना नेहमीच मानाची वागणूक मिळेल आणि प्रभागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, तालुका अध्यक्ष विनायक चव्हाण, संदीप बिबवणेकर, माजी उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जगदीश चव्हाण यांनी केले. या सोहळ्याला उपाध्यक्ष कल्याण कदम, डॉ. शरद जाधव, नरेश कारीवडेकर, नरसू रेडकर, राजू रेडकर, राजा चव्हाण, संजय बांबुळकर आणि चर्मकार समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









