दोडामार्गमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; स्वातंत्र्य सैनिकाचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला

​दोडामार्ग शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याने नागरिकांचा संताप; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

​दोडामार्ग:
दोडामार्ग शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चक्क स्वातंत्र्य सैनिक सूर्यकांत परमेकर यांचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, दुकानाचे शटर न तुटल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि मोठी चोरी टळली. मात्र, या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

​सूर्यकांत परमेकर यांचे दुकान नेहमीप्रमाणे बंद होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे पत्र्याचे शटर मोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी परमेकर दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना शटरशी छेडछाड झाल्याचे व ते मोडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. चोरीचा हा अयशस्वी प्रयत्न असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना याची माहिती दिली.

​या घटनेनंतर संतप्त व्यापारी आणि नागरिकांनी थेट दोडामार्ग पोलीस ठाणे गाठले. गेल्या १५ ते २० दिवसांत तालुक्यात अनेक ठिकाणी चोऱ्या होऊनही पोलिसांना अद्याप एकाही चोरीचा छडा लावता आलेला नाही. या अपयशाबद्दल नागरिकांनी पोलिसांना जाब विचारला. विशेषतः शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचे, विशेषतः पिंपळेश्वर चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ​”पोलीस प्रशासन झोपेत आहे का?” असा सवाल करत, सीसीटीव्ही तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

सीसीटीव्हीसाठी वरिष्ठांकडे बोट

​सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत विचारले असता, पोलिसांनी सांगितले की, कॅमेरे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे. मात्र, वरिष्ठांकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची कबुलीही पोलिसांनी यावेळी दिली. पोलिसांच्या या उत्तरामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली असून, चोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा पूर्णपणे हतबल ठरल्याचे चित्र दिसत आहे.

​तालुक्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या चोऱ्यांचा तपास अद्याप रखडलेला आहे. चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली आहे. आता तरी पोलीस प्रशासन जागे होऊन शहरातील सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित करणार का आणि चोरट्यांच्या मुसक्या आवळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे