देवगड | देवगड मेडिकल फाऊंडेशनचे अस्थिरोग तज्ञ डॉ. तन्मय आठवले यांनी आपल्या वैद्यकीय कार्याचा आणखी एक मानाचा टप्पा पार केला असून, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या International Society of Arthroscopy, Knee Surgery & Orthopaedic Sports Medicine (ISAKOS) या प्रतिष्ठित संस्थेचे मानद सदस्यत्व प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल देवगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जागतिक स्तरावरील या संस्थेचे सदस्यत्व आजपर्यंत भारतामधील केवळ ५९ ऑर्थोपेडिक सर्जनना मिळाले असून, या यादीत डॉ. तन्मय आठवले यांची भर पडणे हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. आधुनिक आर्थ्रोस्कोपी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया आणि स्पोर्ट्स मेडिसिन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून त्यांना हे सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
डॉ. आठवले हे देवगड मेडिकल फाऊंडेशनमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत असून, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरोग शास्त्र संघटनांमध्येही महत्त्वपूर्ण सदस्यत्व मिळवले आहे. तसेच, त्यांच्या अनेक संशोधनपत्रांचा समावेश प्रख्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आहे. त्यांच्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे.












