राजापूर विधानसभा क्षेत्रात भाजपची जय्यत तयारी; सन्मानजनक जागा मिळाल्यासच युतीवर शिक्कामोर्तब

 

राजापूर: प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात कंबर कसली आहे. भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस श्री. अमित केतकर आणि महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पाताई मराठे यांनी राजापूर विधानसभा क्षेत्रातील ११ जिल्हा परिषद गटांचा झंझावाती दौरा नुकताच पूर्ण केला. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी फळी तयार झाली आहे.

या दौऱ्यादरम्यान प्रत्येक जिल्हा परिषद गटात बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. भाजप राजापूर विधानसभा क्षेत्रात युती करण्यासाठी सकारात्मक असली, तरी जागा वाटपात भाजपला कमी न लेखता सन्मानजनक वाटा मिळाला पाहिजे, अशी आक्रमक भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सन्मानजनक युती झाल्यासच कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील, असा सूर या बैठकांमधून उमटला आहे.
इच्छुकांचे अर्ज आणि संघटनात्मक बांधणी
दौऱ्यात ११ जिल्हा परिषद गटांमध्ये प्रत्येकी अर्ध्या तासाच्या बैठका पार पडल्या. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे मागणी अर्ज भरून घेण्यात आले. या दौऱ्यात अमित केतकर आणि शिल्पताई मराठे यांच्यासोबत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. मंदार खंडकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. राजापूर सोबतच संगमेश्वर तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांचा दौराही अमित केतकर यांनी पूर्ण केला असून, तिथेही इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले आहेत.