देवरूख (प्रतिनिधी):
तहसीलदार कार्यालय पुरवठा विभाग, संगमेश्वर (देवरुख) व अखिल भारतीय ग्राहक पंचायत संगमेश्वर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल व काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख येथे ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने मान्यवरांनी केला. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. किरण देशपांडे यांनी केले. प्रास्ताविकात प्रा. देशपांडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले.
श्री. महेंद्र कांबळे (पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसीलदार कार्यालय, संगमेश्वर) यांनी डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. डिजिटल न्यायामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून न्यायप्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक व सुलभ झाल्याचे विविध उदाहरणांसह श्री. कांबळे यांनी स्पष्ट केले. यामुळे सामान्य जनतेला आपली शासकीय कामे कमी वेळात व कमी खर्चात करणे शक्य झाल्याचे नमूद केले. ही प्रक्रिया सोपी असून ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईल करता येणे शक्य असल्याची माहिती दिली. याप्रसंगी ई-रेशनकार्ड रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वप्रथम संगमेश्वर तहसीलदार कार्यालयाने वितरित केल्याचे याप्रसंगी अभिमानाने सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय कार्यकारणी सहसचिव नेहा जोशी यांनी पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी जागृती ग्राहक गटाच्या सदस्यांसह उपस्थितांचे उद्बोधन केले. ग्राहक कायद्याने ग्राहकांना दिलेले अधिकार, ग्राहकांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर माहिती दिली. ग्राहकांची विविध मार्गाने होणारी फसवणूक, सावधानतेचे उपाय व बाळगायची दक्षता, अन्नपदार्थातील भेसळ व फसवणूक याबाबतची अनेक उपयुक्त उदाहरणे देऊन उपस्थितांना सावध केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष प्रा. प्रवीण जोशी यांनी मानले. या कार्यक्रमाला अक्षय सतरकर(पुरवठा निरीक्षक, तहसीलदार कार्यालय, संगमेश्वर) यांच्यासह जागृती ग्राहक गटाचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व सेवक वर्गाचे सहकार्य लाभले.










