शिवसेना आणि भाजपचे शक्तीप्रदर्शन : अर्ज दाखल
अन्य पक्ष व अपक्षांचेही उमेदवारी अर्ज सादर
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेच्या येत्या २ डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रविवारी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवार, १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवसेना आणि भाजपचे देवदर्शन व शक्तीप्रदर्शन
आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री देव पाटेकर आणि श्री देव उपरलकर यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शहरातून रॅली काढून नगरपालिकेत प्रवेश करत उमेदवारांनी अर्ज सादर केले. दुसरीकडे, भाजपकडूनही श्री देव पाटेकर व उपरलकर यांचे दर्शन घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले आणि अर्ज दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये यावेळी मोठा उत्साह दिसून येत होता. अर्ज दाखल करण्याच्या वेळी सावंतवाडी नगरपालिकेच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मोठी गर्दी झाली होती.
प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी
ॲड. निता सावंत कविटकर (मुख्य उमेदवार) आणि भारती मोरे (डमी अर्ज) यांनी अर्ज सादर केले. नगरसेवक पदासाठी दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, दुर्गेश सुर्याजी, संजना पेडणेकर, आरती सावंत, वैभव खम्हापसेकर, गोविंद वाडकर, नासिर पटेल, सायली दुभाषी, प्रसाद नाईक, उत्कर्षा सासोलकर, राहूल नाईक, गुरुप्रसाद मिशाळ, परिक्षीत मांजरेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजू परब, बाबु कुडतरकर आणि अजय गोंदावळे यांनी अर्ज दाखल केले.
तर भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले यांनी उमेदवारी दाखल केली. तर नगरसेवक पदासाठी दिपाली भालेकर, सुधिर आडिवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर, उदय नाईक, मेघना राऊळ, मोहिनी मडगावकर, दुराली रांगणेकर, समृद्धी विर्नोडकर, प्रतिक बांदेकर, प्रेमानंद बबन साळगावकर, सुकन्या टोपले, अनिल निरवडेकर, वेदिका सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
माजी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर देखील रिंगणात
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी मात्र स्वतंत्रपणे नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे वडील श्रीरंग आचार्य, माजी नगरसेवक ॲड. पुष्पलता कोरगावर, व्यंकटेश शेट, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर आदी उपस्थित होते. दरम्यान, उबाठा गटाकडून शहर संघटक निशांत तोरसकर व शिप्रा सावंत यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : रंगत वाढणार
उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार, १७ नोव्हेंबर, हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उर्वरित जागांसाठी भाजप आणि ठाकरे सेना तसेच काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या साक्षी वंजारी यांच्यासह काही नगरसेवक पदाच्या इच्छुकांनी उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. एकंदरीत, अर्ज दाखल करताना आज झालेल्या गर्दीमुळे सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चुरस वाढू लागली असून, सोमवारी अंतिम चित्र स्पष्ट होईल.













