हत्ती हटाव अन्यथा १५ दिवसांत सरकार विरोधात एल्गार!

​दोडामार्गमध्ये शिंदे शिवसेनेचा इशारा; तिलारी हत्ती अधिवास जाहीर करण्यास तीव्र विरोध!!

​दोडामार्ग: सुहास देसाई

“तिलारी खोरे हा वन्य हत्तींचा मूळ अधिवास नाहीच, तरीही या भागाला हत्ती अधिवास घोषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. गेल्या २३ वर्षांपासून हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागायतींचे अपरिमित नुकसान केले असून शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. शासनाने लवकरात लवकर ‘हत्ती हटाव’ मोहीम राबवावी, अन्यथा येत्या १५ दिवसांत आमच्याच सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा सत्ताधारी शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिला आहे.

​दोडामार्ग येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, गुरुदास सावंत, गोपाळ गवस, रामदास मेस्त्री, चेतना गडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

​२३ वर्षांचा वनवास संपवा;

​गणेशप्रसाद गवस पुढे म्हणाले की, “हे हत्ती कर्नाटक राज्यातून अन्नाच्या शोधात या भागात आले आहेत. मागील दोन दशकांहून अधिक काळ वनविभाग आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. हत्तींच्या धुडगुसामुळे काजू, सुपारी, नारळ, केळी आणि आंबा बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे आर्थिक कणा मोडला असून शेतकरी सतत दहशतीखाली जगत आहेत. आता सहनशक्ती संपली असून, हत्तींना हटवून शेतकऱ्यांना भयमुक्त जीवन देणे ही शासनाची जबाबदारी आहे.”

​अधिवास घोषणेला ठाम विरोध
​तिलारी क्षेत्रात हत्तींसाठी संरक्षित अधिवास (Elephant Reserve) जाहीर करण्याच्या हालचालींवर त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. “हत्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. जर शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन छेडले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

​”ही अस्तित्वाची लढाई!”
“ही लढाई केवळ राजकीय नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आहे. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासन स्तरावर तात्काळ निर्णय होणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी हत्ती पकडण्यासाठी कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडे ‘रीट पिटीशन’ दाखल करणार आहोत,” असे श्री. गवस यांनी यावेळी नमूद केले.
​
तालुक्यातील सर्व हत्ती बाधित गावांतील ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.