फळबागांसह पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात आगामी पाच दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता असून, किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या हवामान अंदाजानुसार, २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. या काळात सुरुवातीला हवामान निरभ्र राहील, मात्र ३० डिसेंबर रोजी मुख्यत्वे निरभ्र आणि ३१ डिसेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ६.५ ते ६.८ किलोमीटर असून आर्द्रतेचे प्रमाण ४१ ते ४९ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
या बदलत्या हवामानाचा विचार करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विशेष सल्ला जारी केला आहे. आंबा आणि काजू बागांमध्ये दमट व आर्द्र हवामानामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आंबा पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहोर संरक्षणाच्या वेळापत्रकाप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करण्याचे सुचवण्यात आले आहे. तसेच करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी आणि आवश्यकतेनुसार अझॉक्सीस्ट्रोबिन किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. काजू बागांमध्ये ‘टी मॉस्किटो बग’ आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने लॅम्बडा सायहॅलोथ्रीन किंवा प्रोफेनोफॉसची फवारणी फायदेशीर ठरेल.
भाजीपाला पिकांमध्ये मोहरी, मधुमका, मिरची, वांगी आणि टोमॅटो पिकांसाठी खत व्यवस्थापन आणि पाणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोहरी पिकाची पेरणी होऊन एक महिना झाला असल्यास प्रति गुंठा १ किलो युरिया द्यावा. भाजीपाला पिकांमध्ये रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी निळे आणि पिवळे चिकट सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कलिंगड पिकाला ४-५ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे, तर कोबी आणि पालेभाज्यांच्या नवीन लागवडीसाठी ही वेळ योग्य असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
थंडीच्या पार्श्वभूमीवर पशुपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. गोठ्यातील खिडक्यांना गोणपाटाचे पडदे लावून जनावरांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण करावे. कुक्कुटपालनामध्ये पिल्लांसाठी ब्रुडरचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस राखावे आणि थंडीपासून वाचवण्यासाठी शेडमध्ये विजेचे बल्ब लावावेत. मत्स्यसंवर्धनामध्ये थंड हवामानामुळे पाण्यात ऑक्सिजनची कमतरता भासू शकते, अशा वेळी एरेटरचा वापर करावा किंवा बांबूच्या काठीने पाणी ढवळून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी केंद्र किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.











