गुरुवंदना आणि ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा : विविध उपक्रमांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव येथील शैक्षणिक वारसा जपणाऱ्या ‘मळगाव इंग्लिश स्कूल’च्या वतीने येत्या रविवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी भव्य ‘माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. माजी विद्यार्थी परिवार, मळगाव इंग्लिश स्कूल यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या सोहळ्यात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
रविवारी २८ रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित माजी विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी १०:३० वाजता ईशस्तवन आणि स्वागतपद्याने मुख्य सोहळ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्नेहमेळाव्याचा हेतू स्पष्ट केला जाईल, तर अहवाल सादरीकरणातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल.
*विशेष आकर्षण: गुरुवंदना सोहळा*
या मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरुवंदना’ कार्यक्रम. मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये आजवर ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेले सर्व माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना याप्रसंगी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर हे गुरुजन आपले अनुभव व मनोगत व्यक्त करतील.
*ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान:*
केवळ शिक्षकांचाच नव्हे, तर शाळेच्या जुन्या पिढीतील विद्यार्थ्यांचाही सन्मान यावेळी केला जाणार आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या १० ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. यानंतर विविध वर्षांतील माजी विद्यार्थी आपल्या आठवणींना उजाळा देतील.
*स्नेहभोजन आणि समारोप:*
अध्यक्षांच्या भाषणांनंतर दुपारी १:३० ते २:३० या वेळेत सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी ‘स्नेहभोजन’ आयोजित करण्यात आले आहे. शेवटी आभार प्रदर्शन (ऋणनिर्देश) आणि पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल.
उपस्थित राहण्याचे आवाहन:
शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि जुन्या मित्रांशी संवाद साधण्यासाठी मळगाव इंग्लिश स्कूलच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि अगत्याने या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘माजी विद्यार्थी परिवार’ मळगाव यांच्या वतीने
करण्यात आले आहे.












