महाराष्ट्राच्या जलधीक्षेत्रात मालवण-देवबाग समोरील समुद्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई
सलग दुसऱ्या दिवशी दुसरी कारवाई
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या जलधीक्षेत्रात मालवण-देवबाग समोरील समुद्रात अनधिकृतरित्या ट्रॉलिंग मासेमारी करत असलेली कर्नाटक राज्यातील सी हॉक ही नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने दोन दिवसात दोन नौकांवर कारवाई केली आहे.
२६ डिसेंबर रोजी रात्री १०.२० च्या सुमारास मालवण-देवबाग समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) हे नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्यातील शब्बीर साहेब, वडाबंदेश्वर, उडपी, कर्नाटक यांची नौका सी हॉक, नों. क्र. IND-KA-२-MM-५८७४ ही महाराष्ट्राच्या जलधीक्षेत्रात मालवण-देवबाग समोरील समुद्रात अनधिकृतरित्या ट्रॉलिंग मासेमारी करत असताना पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर ७ खलाशी होते. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे.
अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) यांनी सागरी सुरक्षा, पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.












