फसवणूक प्रकरणात अटक, जामीन अर्जावर सुनावणीपूर्वीच मृत्यू
ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच काळाचा घाला
फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात अटक होऊन येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी उपचारासाठी ससून सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. प्रकृतीच्या कारणावरून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सुनावणी होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी (वय ६४) यांचे शुक्रवारी सकाळी ससून सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उदय जोशी आणि त्यांच्या मुलाला डिसेंबर २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. गॅस एजन्सी व्यवसायाच्या माध्यमातून गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अटकेपासून जोशी येरवडा कारागृहात बंद होते.
दरम्यान, जोशी यांच्या वकिलांनी त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीचे कारण देत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील धमाल यांनी प्रहार डिजिटलला सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून उदय जोशी यांची प्रकृती ठीक नव्हती. ते न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांच्यावर तुरुंगाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.”
उदय जोशी हे १९९७ ते २००२ या कालावधीत सदाशिव पेठ मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते. त्यांच्या निधनाने माजी सहकारी, समर्थक आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.










