संस्कृतीचं डबकं करणाऱ्यांना साहित्याने जागे करावे
जिल्हा साहित्य संमेलनात अध्यक्षा नीरजा यांचे परखड आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी : “साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा आक्रोश नव्हे, तर तो मानवी अस्तित्वाचा आणि आत्मशोधाचा एक समृद्ध प्रवास आहे. आजच्या काळात जिथे समाजमाध्यमांवर केवळ प्रतिक्रियांचे उद्योग सुरू आहेत आणि समाजात अविश्वासाची बीजे पेरली जात आहेत, तिथे देश घडविणारे आणि प्रश्न विचारणारे साहित्य निर्माण होण्याची नितांत गरज आहे. संस्कृतीचे डबकं करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना साहित्यानेच जागे केले पाहिजे,” असे प्रतिपादन प्रख्यात कवयित्री नीरजा यांनी केले.
सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या ‘कविवर्य केशवसुत साहित्य नगरीत’ आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नीरजा भूषवत होत्या. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
*’नाही रे’ वर्गाचे प्रतिबिंब साहित्यात उमटावे*
आपल्या अध्यक्षीय भाषणात नीरजा यांनी साहित्याच्या सामाजिक बांधिलकीवर विशेष जोर दिला. त्या म्हणाल्या, “भूक, पीडा आणि सामान्य माणसाच्या जगण्याविषयी बोलणारे साहित्य आज हवे आहे. ज्यांना आवाज नाही, अशा ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व लेखकांनी केले पाहिजे. लेखकाला आपल्या लेखणीतून काळ उभा करावा लागतो. आजच्या काळात जेव्हा भाषा बिभत्स होत आहे आणि राजकारण रसातळाला जात आहे, तेव्हा लेखकांची जबाबदारी अधिक वाढली आहे.”
*वैचारिक कत्तलीविरुद्ध साहित्याचा एल्गार*
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा उल्लेख करत त्यांनी पर्यावरणासोबतच होणाऱ्या वैचारिक कत्तलीवरही भाष्य केले. “जेव्हा आयआयटीसारख्या संस्थांमधून मंत्रसंस्कारांचे अभ्यासक्रम सुरू होतात, तेव्हा ती एक प्रकारची वैचारिक कत्तल असते. अशा वेळी साहित्यिक, पत्रकार आणि कलावंतांनी कोणत्याही पक्षाचे गुलाम न होता आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
*स्त्रीवाद आणि भाषेचा प्रवास*
स्त्रीवादावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, “स्त्रीवाद म्हणजे केवळ स्त्रियांची मुक्ती नव्हे, तर ती पुरुषांचीही मानसिक बंधनातून होणारी मुक्ती आहे. आजच्या काळातील मुली आत्मशोध घेत लिहीत आहेत, हे सुचिन्ह आहे. स्त्रियांनी पारंपरिक कर्मकांडांतून आणि व्रतवैकल्यांतून बाहेर पडून स्वतःचा ‘आतला आवाज’ ओळखला पाहिजे.” तसेच, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ‘त्रिभाषा सूत्र’ नाकारून मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्याचा व जागतिक स्तरावर अनुवादाची चळवळ उभी करण्याचा विचारही त्यांनी मांडला.
या सोहळ्याला माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले, स्वागताध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांच्यासह अनेक साहित्यिक व कलावंत उपस्थित होते.
*सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध : आ. दीपक केसरकर*
आमदार केसरकर यांनी यावेळी सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असून मुंबईत २०० कोटींचे भव्य केंद्र उभे राहत असल्याची माहिती दिली. या संमेलनात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांचा आणि युवा प्रेरणेचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक वातावरणात आणि मराठी साहित्याच्या नव्या ऊर्जेने झाली.










