ओळख पटवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू
सावंतवाडी : तळवणे येथील तेरेखोल खाडीच्या पाण्यात एका ४३ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या घटनेची माहिती महादेव शशिकांत केरकर (वय ४३, रा. तळवणे सुमेवाडी) यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. तात्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोंदा पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार अरवारी पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.
सदर मृत व्यक्तीच्या उजव्या हातात रुद्राक्षाची माळ आहे, तर अंगावर निळसर फिकट रंगाची जीन्स पँट आणि बनियन आहे. मृतदेहाच्या वर्णनावरून त्याची ओळख पटू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ५८/२०२५, बीएनएसएस १९४ नुसार करण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











