जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये 20 हजारांहून अधिक बस बिघाड
खासगी कंत्राटदारांच्या बसेस ठरतायत डोकेदुखी
वर्षानुवर्षे पीएमपीएमएलच्या बस ब्रेकडाऊनचा प्रश्न कायम असून परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक गंभीर होत चालली आहे. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तब्बल 20,345 बस बिघाड नोंदवले गेले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 19,446 इतकी होती. बस बिघाडामुळे प्रवाशांना वारंवार गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनीही यंदाच्या वर्षातील एकूण ब्रेकडाऊनची संख्या 2024 पेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पुणे : कित्येक वर्षे उलटली तरी पीएमपीएमएल बसच्या ब्रेकडाऊनचा ट्रेंड बदलताना दिसत नाही. उलट ही समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे. पीएमपीएमएलच्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 20,345 बस ब्रेकडाऊन झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 19,446 होती.
पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे की, यंदाच्या संपूर्ण 12 महिन्यांतील ब्रेकडाऊनची आकडेवारी 2024 पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. बाणेर येथील रहिवासी जयेश कुरकर्णी म्हणाले, “दरवर्षी परिस्थिती तशीच असते. पीएमपीएमएल सुधारणा कधी करणार आणि ब्रेकडाऊन कधी कमी होणार, हा प्रश्न आहे. दरवर्षी मोठे दावे होतात, पण प्रवाशांचा त्रास कमी होत नाही.”
पीएमपीएमएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 2023 मध्ये एकूण 17,784 ब्रेकडाऊन नोंदवले गेले होते. मात्र, यंदा केवळ जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीतच हा आकडा त्याहून जास्त झाला आहे. खासगी कंत्राटदारांच्या बसेसमध्ये पीएमपीएमएलच्या स्वतःच्या बसेसच्या तुलनेत अधिक तांत्रिक त्रुटी आढळून येत आहेत.
सध्या पीएमपीएमएलकडे 720 स्वतःच्या बसेस असून, 11 खासगी कंत्राटदारांच्या सुमारे 1,300 बसेस कार्यरत आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात 450 पीएमपीएमएलच्या बसेस आणि 950 खासगी बसेस बिघडल्या. फेब्रुवारीमध्ये 481 पीएमपीएमएल आणि 976 खासगी बसेस तर मार्चमध्ये 499 पीएमपीएमएल आणि 1,181 खासगी बसेस बिघडल्याची नोंद आहे.
पीएमपीएमएलचे सीएमडी पंकज देवरे म्हणाले, “काही खासगी कंत्राटदारांच्या बसेस वारंवार अडचणी निर्माण करत आहेत. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, बसेस दुरुस्त होईपर्यंत देयके रोखण्यात येतील.” प्रवासी कुलकर्णी यांनी सांगितले की, खासगी बसेस जास्त असल्याने बिघाड होतो, हे कारण पीएमपीएमएल देऊ शकत नाही.
उंद्री येथील राहुल श्रेष्ठ म्हणाले की, पीएमपीएमएलने आपल्या प्रतिमेबाबत गंभीर असले पाहिजे. “प्रवाशांसाठी सर्व बसेस पीएमपीएमएलच्याच आहेत. देखभाल आणि योग्य नियोजन करणे अवघड नसावे. तरीही अपयश येत असेल, तर ही गंभीर बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
सीएमडी देवरे यांनी स्पष्ट केले की, वाहतूक कोंडीमुळे ई-बसना अडचणी येत होत्या. त्यामुळे सहा वर्षांहून अधिक काळ चालणाऱ्या बसेसच्या बॅटरी बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच इमर्जन्सी चार्जिंगचा कालावधी अर्ध्या तासावरून एका तासापर्यंत वाढवण्यात आला आहे.
सध्या सर्व बसेसचे फायर ऑडिट सुरू असून, त्यातून अनेक तांत्रिक समस्या समोर येतील, असे देवरे यांनी प्रहार डिजिटल शी बोलताना सांगितले. दरम्यान, पुणे आरटीओने बस ब्रेकडाऊनमुळे ट्रॅफिक जाम होत असल्याने पीएमपीएमएलला नोटीस बजावली आहे.
पीएमपीएमएलच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, जानेवारी 2026 पासून 1,000 सीएनजी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. खासगी कंत्राटदारांनीच त्यांच्या बसेसची योग्य देखभाल करणे आवश्यक असून, आकडेवारीतून ते प्रभावीपणे होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे म्हणाले की, पीएमपीएमएल अधिकाऱ्यांवरील विश्वास प्रवाशांचा उडाला आहे. “बाह्य तज्ज्ञांची नेमणूक, खासगी कंत्राटदारांवर कठोर कारवाई आणि स्वतंत्र यांत्रिकी तपासणी यांसारखी पावले उचलणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे तीच परिस्थिती आहे. प्रवासी आता थकले आहेत,” असे ते म्हणाले.











