दापोली महोत्सव श्री 2025: ओंकार फिटनेसच्या खेळाडूंची दमदार कामगिरी, प्रवीण कांगणे ‘मास्टर’ किताबाचे मानकरी

दापोली (विशेष प्रतिनिधी) : आझाद मैदान येथे पार पडलेल्या दापोली महोत्सव श्री 2025 या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ओंकार फिटनेस, दापोलीच्या खेळाडूंनी आपली ताकद आणि कसब दाखवत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. अंतिम फेरीत शानदार प्रदर्शन करत ओंकार फिटनेसच्या खेळाडूंनी विविध गटांमध्ये विजेतेपदे व पदके पटकावली.
या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरले ओंकार फिटनेसचे खेळाडू श्री. प्रवीण कांगणे. त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत ‘दापोली महोत्सव श्री मास्टर 2025’ हा मानाचा किताब पटकावला. कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रवीण कांगणे यांनी प्रतिस्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद आपल्या नावावर केले.
आझाद मैदान, दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. विविध वयोगट आणि प्रकारांतील स्पर्धांमुळे कार्यक्रमात मोठी रंगत निर्माण झाली होती. उपस्थित प्रेक्षकांनी खेळाडूंच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रवीण कांगणे यांच्या यशामागे रत्नागिरी श्री शरीरसौष्ठवपटू आणि ओंकार फिटनेसचे मार्गदर्शक ओंकार कोळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. योग्य प्रशिक्षण, आहार आणि सातत्यपूर्ण प्रेरणा यामुळेच हे यश मिळाल्याचे प्रवीण कांगणे यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर ओंकार फिटनेस जिममधील इतर खेळाडूंनीही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत दापोलीचे नाव उज्वल केले. विशाल जगदाळे, श्रेयस बांद्रे, ऋषिकेश धामणे, समीर सावंत, अमित जाधव, स्वयम् चांदणे, साई कुळे आणि प्रमोद मोरया यांनी Men’s Physique 2025, Dapoli Top 10 2025 आणि महोत्सव श्री 2025 या गटांमध्ये पदके पटकावली.
या सर्व खेळाडूंना ओंकार फिटनेसचे मालक व प्रशिक्षक ओंकार कोळेकर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या मेहनतीमुळेच आज अनेक खेळाडू राज्य व जिल्हास्तरावर चमकत आहेत. ओंकार फिटनेसच्या या यशाबद्दल दापोली परिसरातून खेळाडूंवर आणि त्यांच्या प्रशिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.