एआय ही आता केवळ तंत्रज्ञानाची शर्यत नाही, तर जागतिक वर्चस्वाची स्पर्धा : गौतम अदानी

भारताने स्वतःचे एआय मॉडेल, संगणकीय पायाभूत सुविधा व इकोसिस्टम उभारली पाहिजे

बारामतीत शरदचंद्र पवार एआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही आता केवळ तांत्रिक प्रगतीची शर्यत राहिलेली नसून ती थेट जागतिक वर्चस्वाची स्पर्धा बनली आहे, असे स्पष्ट मत उद्योगपती गौतम अदानी यांनी व्यक्त केले. भारताने स्वतःची एआय मॉडेल्स, स्वतःची संगणकीय पायाभूत रचना आणि स्वतंत्र बुद्धिमत्ता इकोसिस्टम उभारली नाही, तर देशाचे वर्तन, प्राधान्यक्रम आणि बाजारपेठेतील निर्णय इतर राष्ट्रांच्या प्रणालींनी ठरवले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.


पुणे : बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

अदानी म्हणाले, “भारताने एआयकडे केवळ सुविधा म्हणून पाहू नये, तर भारतामध्ये तयार झालेली, भारतामध्येच शासित आणि राष्ट्रीय हिताशी सुसंगत अशी धोरणात्मक क्षमता म्हणून पाहिले पाहिजे.” मानवी प्रगती सरळ रेषेत होत नसून ती झेपांमधून पुढे जाते आणि प्रत्येक झेप ही तंत्रज्ञान क्रांतीमुळे घडते, असेही त्यांनी नमूद केले.

आज आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीत जगत आहोत आणि ती पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेने परिभाषित होत आहे, असे सांगत त्यांनी इतिहासाचा संदर्भ दिला. “प्रत्येक तांत्रिक संक्रमणात दोन विरोधी शक्ती असतात—असाधारण संधी आणि खोल चिंता. विस्थापनाची भीती, नियंत्रण सुटण्याची भीती ही दुर्बलतेची चिन्हे नसून मानवी स्वभावाचा भाग आहेत,” असे ते म्हणाले.

तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या नष्ट होत नाहीत, तर प्रथम भूमिका बदलतात आणि नंतर नव्या शक्यता निर्माण होतात, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे, असे अदानी यांनी स्पष्ट केले. सेलफोन क्रांतीमुळे नोकऱ्या कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र 1991 ते 2024 दरम्यान भारतात 230 दशलक्ष बिगरशेती नोकऱ्या निर्माण झाल्या, त्यामागे डिजिटल पायाभूत सुविधांचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले.

“जर सेलफोनने भारताला अधिक प्रवेश दिला, तर AI भारताला अधिक क्षमता देईल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की एआय ही पुढील आणि अधिक शक्तिशाली झेप ठरणार आहे. मात्र प्रत्येक तंत्रज्ञानाची झेप ही दुधारी तलवार असते, असा इशाराही त्यांनी दिला.

“सार्वभौमत्वाशिवाय होणारी वाढ अवलंबित्व निर्माण करते. 1.4 अब्ज लोकसंख्येचा देश आपल्या नोकऱ्या, डेटा, संस्कृती आणि सामूहिक बुद्धिमत्ता परदेशी अल्गोरिदम आणि परदेशी हितसंबंधांच्या हाती देऊ शकत नाही,” असे अदानी म्हणाले.

AI चे खरे परिवर्तन तेव्हा सुरू होते, जेव्हा ही मॉडेल्स विमानतळ, बंदरे, वीजजाळे आणि कारखाने यांसारख्या वास्तविक पायाभूत सुविधांमध्ये उतरतात. “यालाच मी AI चे औद्योगिकीकरण म्हणतो,” असे सांगत त्यांनी भारताने या दिशेने वेगाने पावले टाकण्याची गरज अधोरेखित केली.