प्रतिदिन छप्पर पट्टी वसुलीला व्यापारी वर्गाचा तीव्र विरोध .

जाचक करवाढ रद्द करण्याची व्यापारी संघाच्या बैठकीत मागणी

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील खोकेधारकाना व हातगाडी धारकाना करवाढीच्या पाठवलेल्या नोटिसान्मुळे व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत. या संदर्भात राजापूर व्यापारी संघाने बोलावलेल्या छप्परपट्टी धारकांच्या बैठकीत सर्वानुमते या करवाढीला प्रखर विरोध करण्यात आला असुन ही करवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे .दिनांक ७ जुलै २०२३ रोजी राजापूर नगर परिषदेने राजापूर शहरातील सुमारे ३५० छप्पर पट्टी धारक व हातगाडी धारकाना नोटिसा बजावल्या असुन यापुढे सहा महिने अथवा वर्षा ऐवजी दैनंदिन छप्परपट्टी वसुल करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे . ही दैनंदिन छप्परपट्टी १ सप्टेंबर २०२३ पासून करण्यात येणार असल्याचे या नोटिसीद्वारे कळवण्यात आले आहे . १५० चौरस फुटापर्यंतच्या छप्पराला प्रतिदिन ३० रुपये , १५१ फुटाचे वरील छप्पराला प्रतिदिन ५० रुपये , १ मिटर बाय दिड मिटरच्या हातगाडीसाठी प्रतिदिन २० रुपये , त्यापेक्षा वाढीव हातगाडीसाठी प्रतिदिन ३० रुपये व हातगाडी व त्यावरील काढलेले विनापरवाना छप्प्र यासाठी प्रतिदिन ५० रुपये अशी आकारणी करण्यात येणार असल्याचे राजापूर नगर परिषद प्रशासनाने या नोटिसीद्वारे व्यापाऱ्यांना कळवले आहे .

या अगोदर राजापूर नगर परिषद या छप्परधारकाना सहा सहा महिण्याची परवानगी देत होती व त्यासाठी १५० चौरस फुटापर्यंत सहा महिण्याला ४०० रुपये आकारणी करत होती असे या छ्प्परपट्टी धारकानी सांगितले . मात्र आता ज्याप्रकारे नगर परिषद छप्पर पट्टी वसुली करु पाहत आहे ती पुर्वीच्या तुलनेत १५ पट जास्त असुन ही करवाढ व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे असे मत व्यापारी संघाने बोलावलेल्या छप्पर पट्टी धारकांच्या बैठकीत मांडण्यात आले .
राजापूर नगर परिषद लागू करु पाहत असलेली कर पध्दती ही छोट्या व्यापाऱ्यांवर वरवंटा फिरवणारी असुन या करवाढीला राजापूर शहरातील सर्व व्यापारी वर्गाने विरोध केला असुन ४ ऑगस्ट पर्यंत हरकती देण्याच्या कालावधीमध्ये सर्वानी आपल्या हरकती देताना पुर्वीप्रमाणेच करवसुली करण्यात यावी असे नगर परिषदेला लेखी कळवण्याचे ठरवण्यात आले आहे . व्यापारी संघाने बोलावलेल्या या बैठकीसाठी शहरातील सुमारे २५० छप्पर पट्टी धारक व्यापारी हजर होते . या बैठकीला व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर , उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे , खजिनदार दिनानाथ कोळवणकर , व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष रविंद्र ठाकूरदेसाई , प्रकाश कातकर , माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे , नगरसेवक सुलतान ठाकूर अन्य मान्यवर उपस्थित होते .

चौकट –
व्यापाऱ्यांना नोटीसा देवून भविष्यात वसुल केली जाणारी छप्परपट्टी जाचक असुन सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे . या कर वसुलीला व्यापारी संघाचाही विरोध असुन हा विरोध व्यापारी संघाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेवून विरोध दर्शवला आहे
संदीप मालपेकर
अध्यक्ष , राजापूर व्यापारी संघ