सावंतवाडीत सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने नगराध्यक्षांचा सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांचा ‘महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर व अधिकारी कर्मचारी संघटना’ यांच्या वतीने नुकताच विशेष गौरव करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना, निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न शासन स्तरावर आणि नगर परिषद स्तरावर मार्गी लावण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.
येथील नगराध्यक्षांच्या दालनात पार पडलेल्या या छोटेखानी समारंभात संघटनेच्या वतीने सौ. श्रद्धा भोसले यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लखमराजे भोसले यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष संभाजी कांबळे, कार्याध्यक्ष वसुंधरा चव्हाण, सल्लागार चंद्रकांत आकेरकर, सदस्य दत्ताराम म्हापणकर, विजय ओटवणेकर, सदानंद सांगेलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सत्कार समारंभादरम्यान संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी. बी. चव्हाण आणि तालुकाध्यक्ष लवू चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सावंतवाडी नगर परिषदेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, थकबाकी आणि इतर सोयी-सुविधांबाबत अनेक समस्या प्रलंबित आहेत. या समस्यांमुळे वयस्कर कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तरी या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
*नगराध्यक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद*
संघाटनेची मागणी आणि कर्मचाऱ्यांची व्यथा लक्षात घेता नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या म्हणाल्या की, “सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेच्या काळात शहरासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे आमचे कर्तव्य आहे. संघटनेने आपल्या सर्व मागण्यांचे सविस्तर लेखी पत्र सादर करावे. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत रीतसर बैठक घेऊन चर्चा केली जाईल आणि तांत्रिक अडचणी दूर करून समस्या सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील, असा शब्द दिला.












