बंड गार्डन रोडवरील लॉजमध्ये धक्कादायक घटना; पतीचा मृत्यू, पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न

वादानंतर पतीने बाथरूममध्ये घेतला गळफास

पत्नी परिचारिकेची प्रकृती स्थिर, रुग्णालयात उपचार सुरू

पुण्यातील बंड गार्डन रोड परिसरातील एका लॉजमध्ये रविवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली आहे. 28 वर्षीय पती बाथरूममध्ये पाईपला लटकलेल्या अवस्थेत मृत आढळून आला, तर 27 वर्षीय पत्नीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पत्नीला वेळीच वाचवण्यात आले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


पुणे : शहरातील बंड गार्डन रोड परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये रविवारी सायंकाळी पती-पत्नीच्या वादातून गंभीर घटना घडली. 28 वर्षीय तरुण बाथरूममध्ये पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आला, तर त्याची 27 वर्षीय पत्नी खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयराज डोके यांनी प्रहार डिजिटलला दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण कतारमध्ये वास्तव्यास होता आणि तो मूळचा केरळचा आहे. त्याची पत्नी बंड गार्डन रोडवरील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असून, तिला भेटण्यासाठी तो पुण्यात आला होता.

पोलिसांनी जखमी परिचारिकेशी संवाद साधला असता तिने सांगितले की, खोलीत दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पतीने आत्महत्या करण्याची धमकी देत बाथरूममध्ये प्रवेश केला. काही मिनिटांनंतर तिने दरवाजा उघडून पाहिले असता तो लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. घाबरून तिने अलार्म वाजवला, त्यानंतर लॉजचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

कर्मचारी पोलिसांशी संपर्क साधत असतानाच, मानसिक तणावात असलेल्या पत्नीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून तिचा जीव वाचवला. तिला तत्काळ ती ज्या रुग्णालयात कार्यरत आहे त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.