खेड (प्रतिनिधी) – खेड नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीच्या सौ. वैभवी (हेमा वहिनी) वैभव खेडेकर यांची नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल नगर परिषदेत कार्यरत महिला कर्मचारी व सफाई कर्मचारी भगिनींच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नगर परिषदेच्या आवारात झालेल्या या भेटीदरम्यान महिला कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांनी सौ. खेडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी महिला कर्मचारी व सफाई कर्मचारी भगिनींनी सौ. वैभवी खेडेकर यांच्याकडून नगर परिषदेत महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, मूलभूत सुविधा व सन्मानपूर्वक वागणूक यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. नगर परिषदेत महिलांचे प्रतिनिधित्व सक्षम नेतृत्वाखाली होणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी बोलताना सौ. वैभवी (हेमा वहिनी) वैभव खेडेकर यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व महिला कर्मचारी व सफाई कर्मचारी भगिनींचे आभार मानले. नगर परिषदेत सर्व घटकांना न्याय देण्याचा, विशेषतः महिला कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खेड शहराच्या विकासात प्रत्येक कर्मचाऱ्याचा वाटा महत्त्वाचा असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.










