कठोर कारवाई, ई-चलान आणि डिजिटल पाळतीमुळे आकडेवारीत मोठी वाढ
पोलिसांचा इशारा: नागरिकांच्या सहकार्याशिवाय रस्ता सुरक्षा शक्य नाही
पुणे शहरातील रस्त्यांवर होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र समोर आले आहे. 2025 या वर्षात तब्बल 19.87 लाख वाहतूक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ट्रिपल सीट, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल जंपिंग, मद्यप्राशन करून वाहन चालवणे यांसारख्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांकडून कठोर अंमलबजावणी, विशेष मोहिमा आणि ई-चलान प्रणाली राबवण्यात येत असल्याने ही आकडेवारी वाढल्याचे सांगण्यात आले. मात्र, वाहतूक शिस्तीसाठी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुणे : ट्रिपल सीट, डेअरडेव्हिल प्रकारे चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वन-वे उल्लंघन, सिग्नल तोडणे, मोबाइल वापरून वाहन चालवणे आणि फूटपाथवरून वाहन नेणे अशा प्रकारचे वाहतूक गुन्हे पुणे शहरात सातत्याने वाढत असल्याचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केलेल्या वार्षिक गुन्हे अहवालातून समोर आले आहे.
जानेवारी ते 23 डिसेंबर 2025 या कालावधीत 19.87 लाख वाहतूक उल्लंघनांची नोंद झाली आहे. ही संख्या 2023 मधील 10.92 लाख आणि 2024 मधील 11.86 लाख या दोन्ही वर्षांच्या एकत्रित आकडेवारीच्या जवळपास आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वाढीचे कारण कडक कारवाई, विशेष मोहिमा तसेच डिजिटल पाळत व ई-चलान प्रणालीचा वाढलेला वापर असल्याचे सांगितले.
वाहतूक कार्यकर्ते येसुनंद फ्रान्सिस डिसूझा यांनी प्रहार डिजिटल शी बोलताना सांगितले की, वाहतूक नियमभंग वेगाने वाढत आहे आणि काही वेळा पोलीस कर्मचारीही नियम तोडतात. मात्र, नागरिकांना पीटीपी (पुणे ट्रॅफिक पोलिस) ॲप द्वारे उल्लंघनाची तक्रार करता येते. सध्या या ॲपचे 56 हजार सक्रिय वापरकर्ते असल्याची माहिती देण्यात आली.
उंड्री येथील नागरिक कार्यकर्ते सुनील अय्यर म्हणाले की, वाहनांची संख्या प्रचंड वाढली असताना रस्ते मात्र अरुंदच आहेत. अनेक वाहनचालकांना वाहतूक नियम व दंडाची माहिती नाही. पुण्यात डिजिटल निगराणी पूर्णपणे अंमलात आली असती, तर सीसीटीव्ही कव्हरेज आणखी वाढले असते, असेही त्यांनी नमूद केले.
पोलिस उपायुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी सांगितले की, फक्त अंमलबजावणी पुरेशी नाही. रस्ता सुरक्षिततेसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. नियम तोडणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुण्यातील वाहतूक नियमभंग – महत्त्वाची आकडेवारी :
नो एंट्री/वन-वे उल्लंघन – 2025: 5 लाख, 2024: 1.78 लाख, 2023: 21 हजार
चुकीच्या बाजूने वाहन चालवणे – 2025: 43,949, 2024: 26,641, 2023: 14,431
सिग्नल जंपिंग – 2025: 1.71 लाख, 2024: 71 हजार
फूटपाथ ड्रायव्हिंग – 2025: 9,600, 2024: 3,200
ई-चलान प्रणाली अंतर्गत जारी करण्यात आलेल्या 18.72 लाख चलानांपैकी तब्बल 9.75 लाख चलान अद्याप न भरलेले आहेत. 2025 मध्ये 54 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, हा आकडा 2023 मध्ये 46 कोटी आणि 2024 मध्ये 49 कोटी रुपये होता.









