पुण्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये किंचित घट; 2025 च्या वार्षिक गुन्हे अहवालातून दिलासा

पोलीस उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम, बलात्कार व विनयभंगाच्या घटनांमध्ये घट
डार्क स्पॉट्स, गस्त वाढवणे आणि शाळा-महाविद्यालयांजवळ विशेष सुरक्षा

2024 मध्ये वाढलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांनंतर 2025 मध्ये पुण्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये काहीशी घट झाल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या वार्षिक गुन्हे अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. बोपदेव घाट आणि स्वारगेट येथील गंभीर घटनांनंतर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक सक्रिय पावले उचलली. गस्त वाढवणे, असुरक्षित ठिकाणांचे मॅपिंग आणि तक्रारींचे तातडीने निराकरण यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मात्र, या आकडेवारीची पडताळणी करण्याची गरज असल्याचेही लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.


पुणे : 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये वाढलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये यंदा किंचित घट झाल्याचे पुणे पोलिसांच्या 2025 च्या वार्षिक गुन्हे अहवालात समोर आले आहे. बोपदेव घाट आणि स्वारगेट बसस्थानक येथील गंभीर घटनांनंतर महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अनेक सक्रिय उपाययोजना राबवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रहार डिजिटलला दिली.

पोलिस स्टेशन स्तरावर असुरक्षितता मॅपिंग, संवेदनशील भागात वाढीव गस्त, खराब प्रकाश असलेल्या रस्त्यांमध्ये सुधारणा तसेच शाळा आणि महाविद्यालयांजवळील सुरक्षा वाढवणे यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रे आयोजित करण्यात आली असून महिलांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

दामिनी पथक आणि स्थानिक पोलिस ठाण्यांमार्फत गस्त मजबूत करण्यात आली. ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ हे उपक्रम शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आले, तर नोकरदार महिलांसाठी बडी कॉप योजना पुन्हा सक्रिय करण्यात आली. उच्च-जोखीम क्षेत्रे ओळखून सीसीटीव्ही यंत्रणांची तपासणी आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

डोंगर, घाट आणि निर्जन भागात संध्याकाळ व रात्री गस्त वाढवण्यात आल्याने महिलांवरील गुन्हे कमी होण्यास मदत झाल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात महिलांच्या तक्रारींसाठी समर्पित अधिकारी नेमण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आकडेवारीची पडताळणी करण्याची गरज व्यक्त केली आहे. आयसोलेटेड स्पॉट्स आणि खराब प्रकाश असलेल्या ठिकाणांबाबत पोलिस व पीएमसी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला असून, बोपदेव घाट घटनेनंतर 276 डार्क स्पॉट्स उजळण्यात आल्याची माहिती नागरी अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.