पेढेच्या आर. सी. काळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चिपळूण- लोटेकरीता स्वतंत्र बस सुविधा सुरू

चिपळूण (प्रतिनिधी) : भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या पेढे येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चिपळूण-पेढे- लोटे अशी स्वतंत्र बस सुविधा सोमवार, दिनांक २९ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यातील पेढे येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परशुराम लोटे आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी स्वतंत्र बस सुविधा उपलब्ध करून द्यावी, याकरिता गेली अनेक वर्षे संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू होते. शाळा सुटल्यानंतर सायंकाळी विद्यार्थ्यांना लवकर एसटी बस उपलब्ध होत नव्हती. अनेक बसेस चिपळूणहून भरून जात असल्यामुळे फरशी तिठा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुरेशी जागा मिळत नव्हती. अनेक विद्यार्थी रात्री आठ वाजेपर्यंत घरी पोहोचत नव्हते. त्यामुळे या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर एसटी महामंडळाने संस्थेची ही मागणी मान्य करून सोमवार दि. २९ डिसेंबर पासून एसटी बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या एसटी बसच्या शुभारंभ प्रसंगी भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सरचिटणीस सुनील गमरे, उपाध्यक्ष गोपीनाथ रेपाळ, संस्थेचे संचालक प्रवीण पाकळे, सुधीर भोसले, मुख्याध्यापक विनायक माळी, पर्यवेक्षक सौ. विशाखा माळी, चिपळूण एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, प्रशासनातील अधिकारी सौ. काजरोळकर, सौ. सुर्वे, ठसाळे, एसटीचे वाहक आर. एन. अन्सारी , चालक ए. डी. सावंत यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी सर्व मान्यवरांचे संस्था व शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण यांनी आपल्या मनोगतात आर. सी. काळे विद्यालयाकडून तथा संस्थेकडून अनेक वर्षांपासून स्वतंत्र बसची मागणी करण्यात येत होती. मात्र, आमच्या तांत्रिक अडचणीमुळे ती उपलब्ध करून देता येत नव्हते. अखेर अनेक समस्यांवर मात करून या संस्थेसाठी विद्यार्थ्यांकरीता ही बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पुढच्या काळात या सेवेसाठी बसची अधिक व्यवस्था लागली तर तीही उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले. मुख्याध्यापक विनायक माळी यांनी एसटी प्रशासनाचे यावेळी आभार मानले. एसटीचा शुभारंभ करतेसमयी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक माळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व गाडीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी केले.