चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अपघात होऊन टँकरचालकाचा मृत्यू होऊनही हे प्रकरण दडपण्याचा प्रकार उजेडात आणत मनसेने विधवा महिलेला न्याय मिळवून दिला आहे. मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी यात लक्ष घातल्याने इस्लामपूरच्या महिलेला १२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.
यासाठी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनीही सहकार्य केले. त्यामुळे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या टँकरवर चालक म्हणून सांगली-इस्लामपूर येथील संजय शिंदे काम करीत होते. १ ऑक्टोबर २०२३ रोजी गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत टँकरवरून पडून त्यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची कल्पना त्याच्या पत्नी अनिता शिंदे व मुलगा सत्यजित शिंदे यांना देण्यात आली. मात्र शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांना सांगितले गेले. त्यानंतर शिंदे यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्यावर केलेल्या शवविच्छेदन अहवालात मार लागल्याने ‘मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. शिंदे यांच्या अपघाती मृत्यूमुळे माय-लेक उघड्यावर पडले होते. असे असतानाच आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदीच्या मंजुरीसाठी हे प्रकरण प्रांताधिकाऱ्यांकडे आले. यावेळी शिंदे माय-लेकाला खेतले भेटले. यानंतर दडपलेले हे प्रकरण पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. संबंधित टँकरमालकाशी संपर्क साधल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र खेत्ले यांनी कायदेशीर मार्गाने लढा देण्यासह आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर या माय-लेकराला घेऊन ते अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गेले. मालक पोलीस ठाण्यात आला. येथे शिंदे यांची पत्नी, मुलगा, खेतले व पाटील यांची बैठक झाली. या बैठकीनंतर १२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.













