वाडा देवगड येथील गीत गायन स्पर्धेत राजापूरच्या ‘सुरश्री अकादमी’च्या विद्यार्थ्यांचे सुयश

राजापूर (वार्ताहर): दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत, श्रीमती नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ आणि सौ. मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौजन्याने वाडा देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गीत गायन’ स्पर्धेत राजापूर येथील ‘सुरश्री अकादमी’ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल गायनाने परीक्षकांची मने जिंकत विविध गटांत घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत सुरश्री अकादमीच्या एकूण १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अकादमीच्या संचालिका सौ. वसुंधरा मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या बालकलाकारांनी बालगट आणि कुमार गट अशा दोन्ही विभागांत आपली मोहोर उमटवली.
या सपर्धेत बालगटात कु. दुहिता नेहा मकरंद जोशी (विशेष पारितोषिक), कु. सौम्या दीपाली पंकज बावधनकर (तृतीय क्रमांक), कु. आदिश प्राजक्ता अमेय कोरगावकर (प्रथम उत्तेजनार्थ), कु. अभंग आनंद मालपेकर (द्वितीय उत्तेजनार्थ) यांनी सुयश मिळविले. तर कुमार गटात कुमारी रसिका मनीषा संतोष वायंगणकर हिने द्वितीय पारितोषिक पटकावले.
या यशाबद्दल बोलताना सौ. वसुंधरा मालपेकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळेच अकादमीच्या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे. देवगड सारख्या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत राजापूरच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.