माजी केंद्रीय मंत्री व आयओएचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे पुण्यात निधन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

राजकारण आणि क्रीडा प्रशासनातील महत्त्वाची कारकीर्द

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.
वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजकारणासोबतच क्रीडा प्रशासनातही त्यांनी अनेक वर्षे प्रभावी भूमिका बजावली.
त्यांच्या निधनाने पुणे तसेच राष्ट्रीय पातळीवर शोक व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.


पुणे : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणे येथील कलमाडी हाऊस येथे दुपारी २ वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

नवीपेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी ३.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुरेश कलमाडी हे एक अनुभवी राजकारणी तसेच क्रीडा प्रशासक होते. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) चे अध्यक्ष म्हणून काम करताना भारताच्या क्रीडा प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली.

२०१० च्या कॉमनवेल्थ गेम्स भ्रष्टाचार प्रकरणात कलमाडी राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. खेळांच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. एप्रिल २०११ मध्ये अटक झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले होते.

वादांनंतरही त्यांनी क्रीडा संघटनांवरील प्रभाव कायम ठेवला होता. २०१६ मध्ये त्यांना आणि अभय सिंह चौटाला यांना IOA चे आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र या निर्णयावर वाद निर्माण झाल्यानंतर, हा सन्मान स्वीकारण्यास योग्य वेळ नसल्याचे सांगत त्यांनी हे पद नाकारले.

राजकारणात येण्यापूर्वी १९६४ ते १९७२ या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावली आणि १९७४ मध्ये निवृत्त झाले. पुढे १९९५ ते १९९६ दरम्यान काँग्रेस सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले.