वेंगुर्ले येथे पत्रकार दिन साजरा : पत्रकार पुरस्कार प्राप्त प्रदीप सावंत यांचा सत्कार
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज (६ जाने) पत्रकार दिन निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो असे सांगितले. कारण आरसा जसा खरा असतो, तो खोटे सौंदर्य दाखवत नाही. त्याप्रमाणे पत्रकार समाजातील जखमा, अन्याय, विसंगती तो स्पष्टपणे दाखवतो. कारण सत्याकडे पाठ फिरवून समाज पुढे जाऊ शकत नाही. सत्याचा एक प्रामाणिक शब्द प्रकाश निर्माण करतो आणि तो शब्द लिहीणारा पत्रकार आजही समाजाचा दीपस्तंभ आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दीपेश परब, जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार प्रदीप सावंत, सचिव विनायक वारंग, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेंद्र मातोंडकर, पत्रकार दाजी नाईक, योगेश तांडेल, सीमा मराठे, भरत सातोसकर, प्रथमेश गुरव, अजय गडेकर आदी उपस्थित होते.













