दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर ठपका; ११ विश्वस्तांविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस

प्रसूतीनंतर मृत्यू प्रकरणात धर्मादाय आयुक्तांचा कठोर अहवाल

ठेव रक्कम न भरू शकल्याने उपचारास विलंब झाल्याचा निष्कर्ष

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात सह धर्मादाय आयुक्तांनी रुग्णालयाला दोषी ठरवले आहे. रुग्णाला वेळेवर आपत्कालीन उपचार न दिल्याचा ठपका ठेवत ट्रस्टच्या ११ विश्वस्तांवर फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. इंडिजेंट पेशंट फंड असूनही उपचार नाकारल्याचा गंभीर निष्कर्ष अहवालात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला होता.


पुणे : पुण्याच्या सह धर्मादाय आयुक्तांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या वर्षी मार्च महिन्यात घडलेल्या प्रसूतीपश्चात मृत्यू प्रकरणात रुग्णालयाला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात रुग्णालयाच्या ११ विश्वस्तांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली असून, शिवाजीनगर येथील न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला वेळीच आपत्कालीन वैद्यकीय उपचार देण्यात आले नाहीत. रुग्णाच्या कुटुंबीयांना रुग्णालयाने मागितलेली ठेव रक्कम भरता न आल्याने उपचारास विलंब झाला, असा ठोस निष्कर्ष चौकशीत नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अद्याप कोणताही अधिकृत अहवाल किंवा सूचना प्राप्त झालेली नाही. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, संबंधित रुग्णावर चार तास देखरेख ठेवण्यात आली होती. मात्र, डॉक्टरांना न कळवता कुटुंबीयांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि खासगी वाहनातून रुग्णालय सोडले.

रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे की, एका डॉक्टरने रुग्णाच्या कुटुंबीयांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही कुटुंबीयांनी परिसर सोडला. तथापि, या स्पष्टीकरणावर चौकशी समितीने समाधान व्यक्त केलेले नाही.

प्रसूतीनंतर मृत्यू झालेल्या महिलेचे नाव तनिषा भिसे असून, २८ मार्च रोजी तिला सकाळी पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. यापूर्वी तपासणी याच रुग्णालयात झाल्याने कुटुंबीयांनी तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. मात्र कथितपणे रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला आणि ३१ मार्च रोजी दुसऱ्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय निष्काळजी समितीने स्पष्ट मत व्यक्त केले होते की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्णाला दाखल करून तिची प्रकृती स्थिर करणे आवश्यक होते. या प्रकरणामुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवले जाते. नियमानुसार रुग्णालयाने आपल्या एकूण बिलिंगपैकी २ टक्के रक्कम इंडिजेंट पेशंट फंड (IPF) म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. चौकशीत ट्रस्टकडे ३५ कोटी रुपयांहून अधिक IPF उपलब्ध असल्याचे समोर आले.

या पार्श्वभूमीवर सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली. या समितीत धर्मादाय उपायुक्त डॉ. राजेश परदेशी, रुग्णालय विभागाचे अधीक्षक दीपक खराडे यांचा समावेश होता. रुग्णालयातील नोंदी, उपचाराचा कालावधी, वैद्यकीय निर्णय प्रक्रिया आणि व्यवस्थापनाची भूमिका सविस्तरपणे तपासण्यात आली.

चौकशी अहवालात रुग्णालयाचे वर्तन गंभीर आणि निष्काळजीपणाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पब्लिक ट्रस्ट कायदा, १९५० मधील कलम ४१AA आणि ६६(B) चे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले असून, न्यायालयात गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक सचिन बकाल यांनी अधिकृत तक्रार दाखल केली.

३१ मार्च रोजी तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पुण्यात तीव्र संताप आणि निदर्शने झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.