पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; कार विजेच्या खांबावर आदळून तरुणाचा मृत्यू

पेरणे फाटा परिसरात पहाटेची दुर्घटना

एमबीए विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, मैत्रीण जखमी

पुणे-नगर महामार्गावर पेरणे फाटा परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण जखमी झाली आहे. कारवरील ताबा सुटल्याने वाहन थेट विजेच्या खांबावर आदळले. मृत तरुण एमबीएचे शिक्षण घेत असून तो कोरेगाव पार्कमध्ये वास्तव्यास होता. अपघातावेळी दोघेही लाँग ड्राईव्हसाठी बाहेर पडले होते. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


पुणे : पुणे-नगर महामार्गावरील पेरणे फाटा येथे रविवारी पहाटे सुमारे १ वाजता झालेल्या अपघातात कार विजेच्या खांबाला धडकल्याने कार चालविणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण जखमी झाली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव देबागनिक दास (वय 26, रा. कोरेगाव पार्क) असे आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दास वाघोली येथील एका नामांकित महाविद्यालयात एमबीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.

कुंभार यांनी सांगितले की, देबागनिक दास यांचे वडील केंद्र सरकारचे अधिकारी असून ते सध्या बेंगळुरू येथे तैनात आहेत. दास मूळचा कोलकाता येथील रहिवासी होता आणि तो कोरेगाव पार्कमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ३ जानेवारीच्या रात्री उशिरा दास आणि त्याची मैत्रीण अंकिता बराल हे लाँग ड्राईव्हसाठी बाहेर पडले होते. कार चालवत असताना दासला तंद्री लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट विजेच्या खांबावर आदळली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अंकिता बराल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर दोघांनाही फिरायला जायचे होते. अपघातानंतर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे पेरणे फाटा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, लोणीकंद पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.