दोडामार्गात हत्ती हटाव मोहिमेसाठी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा; वनविभागाच्या कार्यालयाला वेढा

​दोडामार्ग प्रतिनिधी:

तिलारी खोऱ्यातील हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाने चौथ्या दिवशी उग्र रूप धारण केले. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे संतप्त झालेल्या शेतकरी आणि आंदोलकांनी गुरुवारी थेट दोडामार्ग वनविभागाच्या कार्यालयाला वेढा घातला. आंदोलकांनी मुख्य दरवाजा उघडण्यास मज्जाव केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल चार तास कार्यालयाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले आहे

​गेल्या २३ वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात हत्ती-मानव संघर्ष सुरू आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. वेळोवेळी निवेदने देऊनही केवळ आश्वासनांशिवाय शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडलेले नाही. सरकारच्या या ‘गाजर’ दाखवण्याच्या भूमिकेविरोधात स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय देसाई, हेवाळे सरपंच साक्षी देसाई आणि कळणे सरपंच अजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडले आहे.

​चार तास कार्यालय बंद
​गुरुवारी सकाळी आंदोलक अधिक आक्रमक झाले. त्यांनी वनविभागाच्या कार्यालयाचे कुलूप उघडण्यास विरोध करत दरवाजासमोरच ठिय्या मांडला. “जोपर्यंत मुख्य वनसंरक्षक स्वतः येत नाहीत, तोपर्यंत दरवाजा उघडू देणार नाही,” असा पवित्रा घेतल्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते.

​वनसंरक्षकांचे आश्वासन, पण आंदोलन सुरूच
​परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून वनक्षेत्रपालांनी मुख्य वनसंरक्षकांशी फोनवरून संपर्क साधला. मुख्य वनसंरक्षकांनी “येत्या दोन दिवसांत दोडामार्ग येथे येऊन बैठक घेऊ” असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी कार्यालयाचे कुलूप उघडण्यास सहमती दिली. मात्र, केवळ आश्वासन मिळाले आहे, ठोस कृती होईपर्यंत आणि मुख्य वनसंरक्षक प्रत्यक्ष भेट देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत वनविभागाच्या आवारात तणावपूर्ण शांतता आणि आंदोलन सुरूच होते.