खनिज शोध सर्व्हेला सात गावांचा तीव्र विरोध

सर्व्हे तात्काळ थांबवा, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

देवगड / प्रतिनिधी :
देवगड तालुक्यातील गोवळ, सोमलेवाडी, पाटगाव, पेंढरी, पाळेकरवाडी, मणचे व महाळुंगे या सात गावांमध्ये सुरू असलेल्या खनिज प्रकल्पाच्या शोध सर्व्हेला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा सर्व्हे तात्काळ थांबविण्यात यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थांनी गुरुवारी देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांना सादर केले. तसेच ग्रामसभेत एकमताने घेतलेल्या ठरावाच्या प्रतीही तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

संबंधित सातही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा व काजूच्या बागायती तसेच शेती व्यवसाय आहे. खनिजासाठी करण्यात येणाऱ्या जमीन उत्खननामुळे या बागायती व शेती धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याशिवाय या परिसरातील जैवविविधता व औषधी वनस्पतींवरही गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हा सर्व्हे सुरू करताना प्रशासनाने अथवा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे या सर्व्हेला सर्व स्तरांतून तीव्र विरोध असून तो तात्काळ थांबवावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सदर खनिज शोध सर्व्हे थांबविण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, सिंधुदुर्ग तसेच जीओ मरीन सोल्युशन प्रा. लि. यांना आपल्या स्तरावरून पत्रव्यवहार करून सर्व्हेक्षणाचे काम थांबवावे, अशी मागणीही सरपंच व ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.

यावेळी पाटगाव सरपंच नीतेश गुरव, महाळुंगे सरपंच संदीप देवळेकर, पेंढरी सरपंच मंगेश आरेकर, तसेच दिनेश मेस्त्री, नाना गोडे, आत्माराम तोरसकर, सुभाष नवळे, सुवर्णा घाडीगावकर, अनंत गोडे, विश्वनाथ सोमले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.