कोंडये शाळा नंबर एक च्या जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप नंतर ग्रामस्थांचा विजयी जल्लोष
संतोष कोत्रे
लांजा -: कोंडये शाळा नंबर एकच्या विद्यार्थ्यांची चक्क जेसीबीत बसवून गुरुवारी रात्री भव्य अशी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निमित्त होते ते जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कोंडये शाळा नंबर एक च्या खो खो लहान गट मुलांच्या संघाने पटकावलेल्या जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप यशाचे. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता हा आनंद साजरा करण्यासाठी महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नु डेरवण येथे संपन्न झाल्या. या जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत कोंडये शाळा नंबर एक च्या खो खो लहान गट मुलांच्या संघाने दैदीप्यमान कामगिरी बजावताना विजेतेपद पटकावले. जिल्हा चॅम्पियन पटकावणाऱ्या या सर्व खेळाडूंचे कोंडये गावच्या सीमेवर गुरुवारी रात्री मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी ,डिजेचा ताल आणि त्यांच्या स्वागतासाठी जमलेले शेकडो कोंडये ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या सर्व खेळाडूंची विद्यार्थ्यांची मोटारसायकल रॅली काढून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प. पू. प्रा. शाळा कोंडये नं.१ शाळेच्या खो खो लहान गट मुले या संघाने अभूतपूर्व यश मिळवून आपल्या शाळेचे आणि कोंड्ये गावाचे नाव उज्ज्वल केले आहे .या संघाचा कर्णधार प्रेम प्रदीप चंदुरकर याच्यासह पार्थ देवेंद्र झिमण, अर्णव रामचंद्र माईल, अर्णव प्रवीण शिंदे, सम्यक संतोष कांबळे, कौशल दिलीप नाटेकर, श्रवण महादेव गुरव आणि वेदांत विकास रांबाडे यांचा समावेश आहे. तर मागील दोन महिन्यांपासून खो खो खेळासाठी विशेष मेहनत घेणारा क्रीडा प्रशिक्षक कु. चेतन सुनील नाटेकर या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान ,आपला संघ जिंकून आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी कोंडये गावचे गावप्रमुख व सर्व वाडीप्रमुख, सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पोलीस पाटील, कोंडये ग्रामसेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य,सर्व पालक,सर्व ग्रामस्थ, सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या गावच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर पटकावलेल्या अभूतपूर्व अशा यशाने तमाम कोंडये ग्रामस्थ आनंदून गेल्याचे चित्र यावेळी दिसून आले.













