रोणापाल येथे आगीत काजू बागायती होरपळली

सुमारे तीन लाखांचे नुकसान

बांदा : प्रतिनिधी
रोणापाल – पुरण येथील मोहर आलेल्या काजू बागायतीला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. उत्पन्न मिळण्याच्या वेळेत आगीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. आगीत शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकरी अमित नकुळ गावडे, सहदेव जयराम गावडे, तानाजी महादेव गावडे यांच्या काजू बागायती जळून खाक झाल्या आहेत.

आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब मागवण्यात आला होता. मात्र तत्पूर्वीच स्थानिक ग्रामस्थ बाबल परब, प्रदिप नाईक, संदेश केणी, सुदीन गावडे, मंगेश गावडे, बाबल तुयेकर, अशोक कुबल यांनी अतोनात प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यावेळी रोणापाल पोलीस पाटील सौ. निर्जरा परब यांनी सुद्धा सहकार्य केले.

आगीची माहिती कृषी व महसूल विभाग यांना देण्यात आली आहे. सदर नुकसानीचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी केली आहे.