वेंगुर्ले येथील डॉ. अजित साटेलकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान..

वेंगुर्ले : दाजी नाईक
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे कृषी अधिकारी या पदावर कार्यरत असलेले श्री. अजित गुरुनाथ साटेलकर यांनी महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर, राजस्थान येथे डॉ. आर. ए. कौशिक व डॉ. बी. आर. साळखी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्यानविद्या या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

डॉ. अजित साटेलकर यांनी “फणसामधील बियांच्या साठवणुकीचा अभ्यास व फणसाचे कलम यशस्वी होण्यासाठी योग्य महिन्याची निवड” या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला होता.

नुकत्याच पार पडलेल्या महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर, राजस्थान या विद्यापीठाच्या १९ व्या पदवीदान समारंभात कुलपती तथा राज्यपाल, आदरणीय श्री. हरिभाऊ बागडे, राजस्थान यांच्या हस्ते डॉ. अजित साटेलकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

सदर कार्यक्रमास डॉ. किरोडीलाल मीना, कृषी मंत्री, राजस्थान व प्राध्यापक डॉ. भागवती प्रसाद वर्मा, चेअरपर्सन ऑफ युनेस्को-इन, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अजित साटेलकर यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ले शाळा नं. ४ येथे, तर दहावीपर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले हायस्कूल, वेंगुर्ले येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात झाले असून तेथून बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर पदवी प्राप्त केली. त्यानंतर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून एमएस्सी अ‍ॅग्रीकल्चर (उद्यानविद्या) पदवी संपादन केली. पुढे त्यांनी महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर, राजस्थान येथे पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल डॉ. अजित साटेलकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.