जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी संप्रदाय तालुका सेवा केंद्राचे आयोजन
बांदा : प्रतिनिधी
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संप्रदाय तालुका सेवा केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने रविवार ११ जानेवारी रोजी मडूरा आरोग्य उपकेंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मानवी जीवन वाचवण्यासाठी रक्तदान हे सर्वोच्च दान मानले जाते. हीच सेवाभावाची भावना मनात ठेवून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्याच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी इन्सुली व माडखोल येथे शिबिर संपन्न झाले असून तिसरे शिबिर रविवारी मडूरा येथे आयोजित केले आहे.
सध्याच्या काळात सर्वच रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे संप्रदाय सेवा केंद्रातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती सावंतवाडी तालुकाप्रमुख राजेश पेडणेकर यांनी दिली. मडुरा येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरात तरुण व सशक्त नागरिकांनी शिबीरात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












