‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर उद्या वेत्ये गावात!

​मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रमाचे आयोजन : मान्यवरांची उपस्थिती

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वेत्ये (ता. सावंतवाडी) ग्रामपंचायतीच्या वतीने उद्या, रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी विशेष ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि कोकणची लाडकी अष्टपैलू अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

​कार्यक्रमाची रूपरेषा:
उद्या सकाळी १०.३० वाजता ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर १०.४५ वाजता मान्यवरांना मानाचा फेटा बांधून, दीपप्रज्वलनाने व अभियान गीताने कार्यक्रमाचा रीतसर शुभारंभ होईल. सकाळी ११.०० वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्दिष्ट आणि वेत्ये ग्रामपंचायतीने आजवर केलेल्या विकासकामांच्या ‘यशोगाथेचे’ सादरीकरण करण्यात येईल. ११.१५ वाजता उपस्थित सेलिब्रिटी कलाकारांच्या हस्ते अभियानाचा जागर केला जाईल आणि दुपारी १२.०० वाजता या विशेष सोहळ्याचा समारोप होईल.

​प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी:
या सोहळ्याला जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर (भाप्रसे), उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, सावंतवाडीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तहसीलदार श्रीधर पाटील आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी गावडे भूषविणार आहेत.

​ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन:
वेत्ये ग्रामपंचायतीने विकासकामांत मारलेली भरारी आणि समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रचार या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गावातील तरुण, महिला आणि सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच गुणाजी गावडे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.