लांजा येथे सुभद्राबाई शिक्षण निधीतर्फे ४२३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण

शिष्यवृत्तीचा विनियोग आपले शैक्षणिक करिअर घडविण्यासाठी करा –सुधीर सिनकर
राजापूर (वार्ताहर): सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबई संस्थेमार्फत गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता दहावी व त्यापुढील कोणत्याही परिक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरा. या शिष्यवृत्तीच्या रकमेचा विनियोग हा आपल्या शिक्षणासाठी करताना जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करून आपले भविष्य घडवा असे आवाहन सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबईचे अध्यक्ष सुधीर सिनकर यांनी केले.
सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबई संस्थेच्या वतीने शनिवारी लांजा येथील न्यु इंग्लीश स्कुल येथे आयोजित वार्षिक शिष्यवृत्ती वितरण सभारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस सुभाष कुलकर्णी, कोषाध्यक्ष सुरेश कावतकर, योगेश सिनकर, सिध्दार्थ सिनकर, स्वाती कुलकर्णी, संध्या कावतकर, श्रध्दा सिनकर, न्यु इंग्लीश स्कुल लांजाचे मुख्याध्यापक श्री. पाटोळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ४२३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी सरस्वती पुजन व दिप प्रज्वलनाने या शिष्यवृत्ती वितरण समारंभांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सुधीर सिनकर यांनी सुभद्राबाई शिक्षण निधीतर्फे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी कोणत्याही जाती धर्माचे बंधन नाही. केवळ ६० टक्के गुण मिळवून हि शिष्यवृत्ती मिळविता येते मात्र स्वार्थी वृत्ती असता कामा नये. या वर्षी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७५४ विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थी व गरजू शैक्षणिक संस्थांना ४७ लाख ७२ हजार रूपये निधी वितरीत होणार असल्याचे सांगितले. गरजू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी असा संस्थेचा प्रामाणिक हेतू असून विद्यार्थ्यांनी स्वत: अर्ज भरले पाहीजेत, बिनचुक भरले पाहीजेत असे सांगताना या मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेतुन आपला  शैक्षणिक खर्च करा आणि भविष्यात समाजाप्रती काम करण्यासाठी पुढे या असे आवाहनही केले.
प्रास्ताविक संस्थेचे चिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले. त्यांनी संस्थेच्या ३९ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुभद्राबाईंनी स्वत:ची पदरमोड करून प्रसंगी स्वत:चे दागिने गहाण ठेवून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा वारसा पुढे वत्सलाबाई कुलकर्णीनी चालविला. या व्यक्तिनी स्वताचा स्वार्थ बाजुला ठेवून समाजासाठी काही केले. आज या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. शेकडो विद्यार्थी, संस्था यांना ही संस्था मदत करत आली आहे. विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा आपल्या अभ्यासाठी विनियोग केला पाहिजे. तुमचा आजचा दिवस हा अभ्यासाचा आहे. आज जर शिकला तरच भविष्य उज्वल आहे. उत्तम शिक्षण हाच आयुष्यात पुढे जाण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे अशा शिष्यवृत्तीचा फायदा घेवून आपण आपले करिअर घडविले तरच आमचे हे उद्दीष्ट साध्य झालं असं म्हणता येईल. चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हा अशा सदिच्छा विद्यार्थ्यांना दिल्या. अशा प्रकारे शिष्यवृत्तीच्या माध्यमातुन समाजातील गरजवंताना होणारी ही मदत निश्चितच त्यांच्या यशात महत्वाची ठरते, त्यामुळे आपणही भविष्यात अशाच प्रकारे समाजाप्रती देणं लागतो या भावनेतुन काम करण्यासाठी पुढे या असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सिध्दार्थ सिनकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यांनी केवळ पदवी न मिळवता कौशल्याआधारीत शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे सांगितले. जीवनात काही तरी करून दाखविण्याची जिद्द बाळगली पाहीजे ही संस्था कायम तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही दिली.
या शिष्यवृत्ती वितरण सोहळयात सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबई संस्थेच्या वतीने सुमारे ४२३ विद्यार्थी व काही संस्थांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तर विशेष पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला साईनाथ झारापकर, मनिष पाटील,  वात्सल्य मंदिर ओणीचे डॉ. महेंद्र मोहन, जुवाठीचे माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांसह संस्थापदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी चव पालक उपस्थित होते. प्रारभी मान्यवरांचे स्वागत श्री. पाटोळे यांनी केले. तर आभार  श्रध्दा सिनकर यांनी मानले.