शासकीय वनक्षेत्रातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी ५ आरोपी जामिनावर मुक्त

ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद

कुडाळ:
शासकीय वनक्षेत्रात घुसून विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कुडाळ येथील मा. न्यायालयाने दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पाचही आरोपींची जामिनावर मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्ततेचा आदेश दिला. या प्रकरणात ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव व ॲड. सुयश गवंडे यांनीही काम पाहिले.

वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्या फिर्यादीवरून रा. गुन्हा क्र. सी ०१/२०२६ अन्वये आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१)(ए, डी, एफ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना दि. ११ जानेवारी २०२६ रोजी अटक करून दि. १२ जानेवारी रोजी रिमांड रिपोर्टसह कुडाळ येथील मा. न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी वनविभागाकडून दोन दिवसांची वन कोठडी मागण्यात आली होती, मात्र मा. न्यायालयाने वन कोठडी नाकारून आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, आरोपींतर्फे दि. १२ जानेवारी २०२६ रोजी जामीन अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर झालेल्या सुनावणीत ॲड. विवेक मांडकुलकर यांनी केलेला सविस्तर युक्तिवाद व सादर कागदपत्रांचा विचार करून मा. न्यायालयाने त्याच दिवशी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर आरोपींची मुक्तता केली.

या गुन्ह्याबाबतची फिर्यादी हकीकत अशी की, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनपाल नेरूर (ता. हवेली) यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांसह मौजे मिटक्याचीवाडी येथील निर्णीत वनसर्वे क्रमांक ९४/१ मध्ये तपासणी केली. त्या ठिकाणी अवैध वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी प्रकाश शंकर तावडे (रा. मिटक्याचीवाडी, ता. कुडाळ) व त्यांचे मजूर कार्तिक रामा नाईक, संदीप विष्णू नाईक, रामा सिद्धा नाईक व तुकाराम गोविंद नाईक (सर्व रा. चौकुळ–केगदवाडी, ता. सावंतवाडी) आढळून आले.

आरोपींनी सदर वृक्षतोड आपल्याच मालकीच्या सर्वे क्रमांक ९५ मध्ये केल्याचा दावा केला. मात्र वनकर्मचाऱ्यांनी हद्दीच्या खुणा दाखवून सदर वृक्षतोड ही शासकीय वनसर्वे क्रमांक ९४/१ मध्ये झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पंचासमक्ष पाहणी करून बुंध्यांची मोजमापे, तयार झालेल्या इमारती व जळावू लाकूड यांचे मोजमाप करून पंचनामा व जप्तीनामा करण्यात आला.

या प्रकरणात वापरण्यात आलेले पाळ कोयता (१), हात कोयते (२) व लाकूड कटर मशीन (२) जप्त करण्यात आली. तसेच आरोपी क्रमांक १ ते ५ यांचे जबाब नोंदवून वनरक्षक नेरूर (ता. हवेली) यांनी प्रथम रिपोर्ट क्र. ०१/२०२६ नुसार गुन्हा नोंदविला.

या प्रकरणाची पुढील चौकशी वनविभागाकडून सुरू आहे.