१५ वर्षांनंतर पुन्हा जुळल्या आठवणींच्या रेशीमगाठी

सन २०१० च्या एसटी वाहक भरतीतील कर्मचाऱ्यांचा तळगाव येथे स्नेहमिलन सोहळा उत्साहात

स्वप्निल कदम- कुडाळ : सन २०१० च्या एसटी वाहक (कंडक्टर) भरतीतील कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा ९ ऑगस्ट रोजी गारवा रिसॉर्ट, तळगाव (मालवण) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या सहकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध अधिक दृढ केले.

 

या स्नेहमिलनास कणकवली, देवगड, विजयदुर्ग, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला व सावंतवाडी आगारातील वाहक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत सहकारी कै. स्वप्नील जोशी, कै. लाडोबा लाड, कै. शैलेश माणगावकर, कै. गोदावरी खाजनवाडकर, कै. जितेंद्र मेंगाळ व कै. वडार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या नातेवाईकांना सांत्वनपर भेटवस्तू देऊन सहवेदना व्यक्त करण्यात आली.

 

यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला. बॅचमधून बढती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रमोद तांबे, संध्या कदम, सुप्रिया सावंत, वृंदा कदम, रसिका परब, दीपाली मर्गज, चारुशीला वालावलकर, गणेश कुंभार, हेमंत वालावलकर, स्वप्नेश खानोलकर, तुकाराम गवस व प्रदीप बागायतकर यांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

 

तब्बल १५ वर्षांनंतर सर्वांना पुन्हा एकत्र आणण्याची संकल्पना सुनील करलकर यांनी मांडली. या आवाहनाला प्रतिसाद देत विजयदुर्ग येथून बदली होऊन सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असलेले गणेश करमळे, सांगली येथून सौ. एम. आर. गायकवाड तसेच रत्नागिरी-लांजा येथून साधना वाटवे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

गीता निकम यांनी स्वागतपर गीत सादर करून कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली. वाहक लक्ष्मण पाटील यांनी वाहक कर्मचाऱ्यांवर आधारित कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. दुपारी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर फनी गेम्स, मस्ती-मौज आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत भरली.

 

हा स्नेहमिलन सोहळा यशस्वी करण्यासाठी मिथुन बांबूळकर, सुनील करलकर, देवदास प्रभूखोंत, स्वप्नील शिंदे, गौरव महाकाळ, अमित चव्हाण, दीक्षा हिंदळेकर, शितल मयेकर आदी सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद चव्हाण यांनी केले, तर विठ्ठल जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

१५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकत्र आलेल्या या सहकाऱ्यांच्या स्नेहमिलनाने जुन्या आठवणींना उजाळा मिळण्याबरोबरच मैत्री, आपुलकी आणि सहकाऱ्यांमधील जिव्हाळ्याचे बंध अधिक दृढ झाले.