पीएमपीएमएलला एप्रिलअखेर 600 ते 700 बसेसच; 2,500 बसेस लगेच येणे अशक्य

ई-बस व सीएनजी बसेसच्या पुरवठ्यावर अनिश्चितता

कंत्राटी बसेसच्या बिघाडामुळे प्रवाशांची नाराजी

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पीएमपीएमएलच्या बस ताफ्याबाबत वास्तव समोर आले आहे. जरी 2,500 नवीन बसेसची घोषणा करण्यात आली असली, तरी एप्रिलअखेर प्रत्यक्षात 600 ते 700 बसेसच मिळण्याची शक्यता आहे. ई-बससाठी केंद्र सरकारच्या निविदा प्रक्रियेमुळे विलंब होणार आहे. याचबरोबर सीएनजी बसेसचा पुरवठा टप्प्याटप्प्याने होणार आहे. कंत्राटी बसेसच्या वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.


पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ला या वर्षाच्या एप्रिल अखेरीस केवळ 600 ते 700 नवीन बसेस मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी अलीकडेच 2,500 नवीन बसेस येणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र प्रत्यक्षात संपूर्ण ताफा इतक्या लवकर उपलब्ध होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

पीएमपीएमएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रहार डिजिटलला सांगितले की, 2,500 बसेस पाइपलाइनमध्ये असल्या तरी त्या सर्व अल्पावधीत सेवेत येणे शक्य नाही. पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांनी सांगितले की, घोषित 2,500 बसेसपैकी 1,000 बसेस या केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत येणार आहेत.

“या ई-बससाठी केंद्र सरकारने नुकत्याच निविदा काढल्या आहेत आणि त्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत सुमारे 160 ई-बस मिळण्याचीच वास्तववादी शक्यता आहे,” असे चौहान यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पीएमपीएमएलने टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड यांच्याकडून 1,000 स्व-मालकीच्या सीएनजी बसेसची मागणी केली आहे. “अशोक लेलँडने तयार केलेल्या सुमारे 600 बसेस एप्रिल किंवा मे अखेरीस सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बस ताफा वाढेल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल,” असेही त्यांनी सांगितले.

नागरी उड्डाण राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वी सांगितले होते की, नवीन बसेसमुळे पीएमपीएमएलचा ताफा सुमारे 4,000 बसेसपर्यंत वाढेल आणि मार्गांची संख्या 100 ने वाढेल. सध्या पीएमपीएमएलकडे एकूण 1,988 बसेस असून, दररोज 1,600 ते 1,930 मार्गांवर सेवा दिली जाते.

2025 मध्ये पीएमपीएमएलने 400 सीएनजी बसेस ताफ्यात समाविष्ट केल्या होत्या; मात्र त्या सर्व कंत्राटी स्वरूपातील होत्या. सध्याच्या 1,988 बसेसपैकी केवळ 701 बसेस पीएमपीएमएलच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत, तर उर्वरित 1,287 बसेस या 11 वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून चालवल्या जात आहेत.

नियमित प्रवासी प्रमेश दंडे यांनी सांगितले की, “कंत्राटी बसेस वारंवार बंद पडतात, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. देखरेखीचे दावे असले तरी प्रत्यक्षात नियंत्रण अपुरे दिसते. पीएमपीएमएलने स्वतःच्या मालकीच्या बसेस वाढवण्यास प्राधान्य द्यायला हवे.”

दरम्यान, नागरी कार्यकर्त्यांनी 2,500 बसेसचा दावा हा महत्त्वाकांक्षी राजकीय वचन असल्याचे म्हटले आहे. पीएमपी प्रवासी मंचाचे संजय शितोळे यांनी सांगितले की, लॉजिस्टिक अडथळे अनेकदा दुर्लक्षित केले जातात. “राज्य सरकारकडून अभूतपूर्व दबाव आल्याशिवाय पुढील तीन ते चार महिन्यांत 2,500 बसेस मिळणे अशक्य आहे,” असे ते म्हणाले.

शितोळे यांनी पुढे नमूद केले की, 650 ई-बससाठीच्या आधीच्या ऑर्डरपैकी फक्त 490 बसेस वितरित झाल्या असून, उर्वरित बसेस वर्षभरापासून प्रलंबित आहेत. तसेच, इतक्या मोठ्या प्रमाणात बसेस ठेवण्यासाठी आवश्यक डेपो पायाभूत सुविधा सध्या पीएमपीएमएलकडे उपलब्ध नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.