खेड (प्रतिनिधी) – खेडच्या आकाशात लढाऊ विमानांचे भव्य उड्डाण प्रत्यक्ष पाहण्याची संधी येत आहे. लायन्स क्लब ऑफ खेड व शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जानेवारी 2026 रोजी पाटीदार भवन शेजारील मैदानात सकाळी 9 ते 11 या वेळेत या उड्डाण शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये भारतीय वायुसेनेच्या मिराज-2000, तेजस, राफेल आणि सुखोई-30 या चारही अत्याधुनिक फाइटर्सचे रिमोट कंटरोल (RC) मॉडेल्स थरारक उड्डाण सादर करणार आहेत.
या अनोख्या शोदरम्यान कर्टन टेक-ऑफ, आकाशात वर्तुळाकार उड्डाण, वेगवान गिरक्या, स्ट्रीट रोल, टाइट रोल, एरोबॅटिक्ससह विविध हवाई कसरतींचे लाइव्ह प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. विशेषतः एकाच पाठोपाठ एक विमानाने लो-लेव्हल फ्लायपास, उच्च उड्डाण, ताशी 50 ते 200 फूटांवरील वेगवेगळ्या स्टंट्स व अचानक घेतलेली वळणे यामुळे प्रेक्षकांचे डोळे विस्फारतील. पायलट्सच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या दिशांनी झेपावणारी विमाने, वेगात होणारी दिशा बदल, क्षणात घेतलेली झेप आणि आकाशात घुमणारा इंजिनाचा आवाज प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकणार आहे.
यामुळे खेडवासीयांना भारतीय वायुसेनेची ताकद, तांत्रिक कौशल्य, आधुनिक युद्धनीती, विमानांचं रचना-विज्ञान आणि उड्डाण प्रणाली याची वास्तविक अनुभूती मिळणार आहे. अद्यापपर्यंत बहुतेक नागरिकांनी ही विमाने केवळ आकाशात दूरवरूनच पाहिली आहेत. मात्र या शोमुळे लढाऊ विमानांची रचना, त्यांचे नियंत्रण, इंजिन शक्ती, गतिशीलता आणि विविध क्षमतांबाबत माहिती प्रत्यक्ष पाहता-समजता येणार आहे.
या कार्यक्रमात उपस्थितांसाठी माहितीपर मार्गदर्शन सूत्रसंचालनाद्वारे दिले जाणार असून लढाऊ विमानांचे आरसी मॉडेल तयार करण्यासाठी आवश्यक असणारे विज्ञान, तंत्रज्ञान व सराव याची माहितीही देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी केवळ 500 रुपयांत तीन उड्डाणांच्या अनुभवाचे विशेष किटदेखील उपलब्ध केले जाणार आहे.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, भारतीय वायुसेनेबद्दल आदर व प्रेरणा निर्माण करणे आणि तरुणांमध्ये पायलट किंवा एरोनॉटिकल इंजिनिअर होण्याची प्रेरणा निर्माण होणार आहे.
लायन्स क्लब ऑफ खेड व शिवचैतन्य नागरी पतसंस्थेचे श्री. अरविंद भिक्कूशेटे तोंडकर व श्री. महेंद्र मोरेश्वर शिरगावकर यांनी खेड तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी या भव्य कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. हा शो पाहिल्यानंतर खेडमधील अनेक विद्यार्थी भविष्यात भारतीय वायुसेनेत पायलट किंवा अभियंता बनण्याची प्रेरणा घेतील, असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला आहे. खेड तालुक्यात होत असलेल्या या ऐतिहासिक उड्डाण शोची उत्सुकता चांगलीच वाढली असून नागरिकांमध्ये या कार्यक्रमाविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.













