‘रत्नसिंधू जलसंपदा मित्र परिवारा’चे काम कौतुकास्पद

माजी सचिव देवेंद्र शिर्के यांनी व्यक्त केले गौरवोद्गार

कुडाळ । प्रतिनिधी : जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ५८ ते ८५ वयोगटातील कर्मचाऱ्यांना ‘रत्नसिंधू जलसंपदा मित्र परिवारा’च्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. या स्नेहसंमेलनामुळे कित्येक वर्षांनी जुने सहकारी एकत्र येत असून, हे एक पुण्याचे काम आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा विभागाचे माजी सचिव देवेंद्र प. शिर्के यांनी काढले.

कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात ‘रत्नसिंधू जलसंपदा परिवार (सेवानिवृत्त)’ या ग्रुपचे दुसरे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्य अभियंता बी. बी. पाटील, सुभाष वाघमारे, प्रकाश अबनावे, सुनील काळे, माजी अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, माजी कार्यकारी अभियंता बांदेकर, लवेकर, दत्ताराम सडेकर, बापू कुबल उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते अभियंता विश्वेश्वरय्या व लक्ष्मीदेवीच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी ७५ वर्षांत पदार्पण केलेल्या सदस्यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सर्वात ज्येष्ठ सभासद दत्ताराम सडेकर (८५ वर्षे) व बापू कुबल यांचा प्रथम सत्कार करण्यात आला.

यावेळी बी. बी. पाटील यांनी निवृत्तीनंतरच्या जीवनात अशा उपक्रमांमुळे नवीन ऊर्जा मिळते, असे मत व्यक्त केले. प्रकाश अबनावे यांनी या ग्रुपच्या माध्यमातून एनजीओ स्थापन करून सामाजिक काम करण्याचे आवाहन केले. तसेच, जिल्ह्यातील प्रकल्पांच्या माहितीच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कार्यकारी अभियंता विनायक जाधव व उपविभागीय अधिकारी मंगेश माणगांवकर यांचाही विशेष सत्कार झाला.

कार्यक्रमाला ३०० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात रश्मी वालावलकर यांनी स्वागतगीत गायले. श्रीकांत ढालकर यांचा बोलका बाहुला, लोहोकरे यांचे गायन, कुरणे यांचे बासरी वादन व श्री. काळे यांनी सादर केलेली किशोर कुमार यांची गीते आकर्षणाचे केंद्र ठरली.

प्रास्ताविक राजू तावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीराम चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम चव्हाण, राजू तावडे, राजन वालावलकर, संजय शेणई, सुरेश वर्दम, रत्नकुमार दामले आणि नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी कष्ट घेतले.