‘वीरगाथा ५.०’ मध्ये कास शाळेची शमिका गवंडी राष्ट्रीय स्तरावर झळकली
बांदा : प्रतिनिधी
भारत सरकारच्या वतीने सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘वीरगाथा ५.०’ उपक्रमात सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नं. १ ची विद्यार्थिनी शमिका सदू गवंडी हिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. शमिका ही संपूर्ण देशाभरातून २३ वी आली. तिची ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
देशाच्या वीर जवानांच्या शौर्यगाथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना रुजावी, या उद्देशाने केंद्र सरकारमार्फत ‘वीरगाथा’ प्रकल्प राबविला जातो. यावर्षी या उपक्रमात देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून अंतिम १०० गुणवंत विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. या गौरवशाली निवडीत महाराष्ट्रातील एकूण १९ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून राज्याचा दबदबा निर्माण केला आहे.
यामध्ये सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील शमिका गवंडी हिने मारलेली गरुड झेप विशेष कौतुकास्पद मानली जात आहे. तिने आपल्या कल्पकतेतून आणि सादरीकरणातून राष्ट्रीय परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. शमिकाच्या या यशाबद्दल तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि तिच्या पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सावंतवाडी तालुक्यातील शिक्षणप्रेमींनी तिचे अभिनंदन केले आहे. शमिकाच्या या यशामुळे कास गावाच्या आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.









