सायबर गुंतवणूक घोटाळा; रिअल इस्टेट डेव्हलपरच्या कर्मचाऱ्याला 46.33 लाखांचा फटका

डेटिंग ॲपवर ओळख, ट्रेडिंगच्या आमिषातून आर्थिक फसवणूक

वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल, देशभरातील खात्यांत पैसे ट्रान्सफर

पुण्यातील एका नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपरच्या कर्मचाऱ्याची सायबर चोरट्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. कमोडिटी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून पीडितेने तब्बल 46.33 लाख रुपये विविध बँक खात्यांत ट्रान्सफर केले. सुरुवातीला नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, पैसे काढण्याच्या वेळी कराच्या नावाखाली अधिक रकमेची मागणी झाल्यानंतर फसवणूक उघडकीस आली.


पुणे : शहरातील एका प्रख्यात रिअल इस्टेट डेव्हलपरच्या 43 वर्षीय कर्मचाऱ्याला गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान सायबर चोरट्यांनी 46.33 लाख रुपयांचा गंडा घातला. वाघोली परिसरात राहणाऱ्या पीडित व्यक्तीने कमोडिटी आणि सेंच्युरी मार्केटमध्ये गुंतवणुकीवर चांगला नफा मिळेल, या आश्वासनावर विश्वास ठेवून ही रक्कम विविध बँक खात्यांत ट्रान्सफर केली.

पीडिताने सुरुवातीला ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. प्राथमिक तपासानंतर रविवारी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाघोली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित कर्मचारी डेटिंग ॲपच्या माध्यमातून घोटाळेबाजांच्या संपर्कात आला. त्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ऑइल, फॉरेक्स, मेटल, क्रिप्टोकरन्सी यांसारख्या बाजारातील गुंतवणुकीबाबतचे संदेश त्याला पाठवण्यात आले.

घोटाळेबाजांनी दिलेल्या लिंकवर ट्रेडिंग खाते उघडण्यास सांगण्यात आले. एका महिलेने मोबाईल मेसेजिंग ॲपद्वारे संपर्क साधून गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन केले. पीडिताने प्रथम 25 हजार रुपये गुंतवले आणि त्यावर 10 हजार रुपयांचा नफा दाखवण्यात आला. त्यातून 3 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आल्याने त्याचा विश्वास अधिक दृढ झाला.

यानंतर पीडिताने घोटाळेबाजांच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा ट्रान्सफर केल्या. त्यासाठी त्याने जमिनीचा तुकडा विकला, मित्रांकडून पैसे घेतले तसेच वैयक्तिक कर्ज आणि सोन्याचे कर्ज घेतले. एकूण 46.33 लाख रुपये विविध खात्यांत पाठवण्यात आले.

काही काळानंतर पीडिताच्या खात्यात 1.74 कोटी रुपयांचा नफा दाखवण्यात आला. मात्र, जेव्हा त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कराच्या नावाखाली आणखी 35 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. याबाबत पीडिताने आपल्या भावाला माहिती दिल्यानंतर पोलिसांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला.

तपासादरम्यान असे उघड झाले आहे की, पीडितेचे पैसे बिहारमधील गया, उत्तर प्रदेशातील लखनौ, गुजरातमधील सुरत तसेच तामिळनाडूतील चेन्नई, कोईम्बतूर आणि कन्याकुमारी येथील विविध बँक खात्यांत ट्रान्सफर करण्यात आले होते. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रहार डिजिटल)