प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय रॅलींमुळे पुण्यात वाहतूक ठप्प

वाहतूक कोंडी सोडवण्याची आश्वासने, पण पुणेकरांचे हाल

रोड शोमुळे नागरिक संतप्त, सोशल मीडियावर नाराजी

महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पुण्यातील विविध भागांत राजकीय रॅली आणि रोड शोमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
वाहतूक कोंडी सोडवण्याची मोठी आश्वासने देणाऱ्या इच्छुक नगरसेवकांच्या प्रचारामुळेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
दुपारनंतर शहरातील अनेक प्रमुख रस्ते बंद करण्यात आल्याने प्रवासी अडकून पडले.
सोशल मीडियावर नागरिकांनी संताप व्यक्त करत नेत्यांच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मतदानानंतर परिस्थिती सुधारेल का, असा सवाल पुणेकर विचारत आहेत.


पुणे : शहरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि वाहतूक कोंडीवर उपाय करण्याची मोठी आश्वासने देणाऱ्या बहुतांश इच्छुक नगरसेवकांच्या प्रचार रॅलींमुळे मंगळवारी शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांची वाहतूक ठप्प झाली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या रोड शो आणि प्रचार सभांमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रॅलीमुळे दुपारनंतर शहरातील विविध भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रवाशांना वेळेवर कार्यालये आणि घरी पोहोचणे कठीण झाले. कॅम्प परिसरात अडकलेले जगदीश पाहणे म्हणाले, “वाहतूक कोंडी सोडवण्याची भाषा करणाऱ्यांच्याच रोड शोमुळे ट्रॅफिक जाम झाला.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोमुळे सेनापती बापट रोडलगतच्या गोखलेनगर भागातील रस्ते बंद करण्यात आले. “एक किमी अंतर कापण्यासाठी ४५ मिनिटे लागली. अशा परिस्थितीत वाहतूकमुक्त पुण्याचे आश्वासन कसे द्यायचे?” असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला.

सोशल मीडियावरही नागरिकांचा संताप दिसून आला. विवेक फड यांनी एका बाईक रॅलीचे छायाचित्र पोस्ट करत पुणेकरांना लक्ष देण्याचे आवाहन केले. तर पीएमपीएमएल बसमधील प्रवाशाने X वर “वाहतूक सुधारण्याची आश्वासने देणारेच रस्ते अडवत आहेत,” असे नमूद केले.

पर्वती, कोथरूड, कोंढवा, साळुंके विहार आणि भोसरी भागांतही नागरिकांना सलग अनेक तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत एका प्रवाशाने विचारले, “आत्ताच ही परिस्थिती असेल, तर मतदानानंतर काय होणार?

खासदार आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या रोड शोमुळे कोंढवा आणि साळुंके विहार परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाली. कोंढव्याच्या रहिवासी शीतल दीक्षित म्हणाल्या, “विजयाआधीच जनतेला त्रास देणारे नेते आदर्श कसे ठरू शकतात?

भोसरीतील कार्यरत व्यावसायिक अनुज शास्त्री म्हणाले, “राजकीय रॅलींसाठी संपूर्ण परिसर बंद करण्यात आला. या उमेदवारांच्या आश्वासनांमध्ये तथ्य दिसत नाही,” असे त्यांनी प्रहार डिजिटलला सांगितले.