चौके येथील बिरू खरात बनला ‘अग्निवीर’ 

चिरेखाण कामगार पुत्र झाला भारतीय सैन्यात दाखल

चौके – प्रतिनिधी : – परराज्यातील आपले गाव सोडून आपले आईवडील उदरनिर्वाहासाठी चौके गावात येत भाड्याची खोली घेऊन चिरेखाणीवर मेहनतीचे काम करतात त्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत चौक येथील येथील भ.ता.चव्हाण महाविद्यालय चौके या प्रशालेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मालवण स.का. पाटील महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सैन्यात जाण्याची इच्छा बाळगत जिद्द आणि अपार कष्ट करत होता त्यातच स का पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एन सी सी कॅडेट म्हणून निवड झाली यातूनच आपले सैन्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहाटे उठून शारीरिक व्यायाम करणे यावर जास्त भर दिला.बिरू कॉलेज शिक्षणाबरोबर सुट्टीच्या दिवशी वडिलांना मदत म्हणून चिरेखाणी वर काम करत असे. आपण शालेय जीवनात भविष्यासाठी पाहिलेले स्वप्न मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर पूर्ण करू शकतो हे बिरू खरात यांनी सिद्ध करून दाखवले. मालवण तालुक्यातील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील 4 विद्यार्थ्यांचीअग्निवीर म्हणून निवड झाली आहे यात चौके येथील बिरू खरात या युवकाने भारतीय सैन्य दलात ‘अग्निवीर’ म्हणून निवड सार्थ ठरवत आपल्या सध्या राहत असलेल्या चौके गावासह संपूर्ण तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.

बिरू खरात या खाणकामगाराच्या मुलाची भारतीय सैन्यात निवड झाल्याचे वृत्त समजताच चौके गावातून त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे. चौके हायस्कूल मुंबई संस्था, स्थानिक संस्था,माजी विद्यार्थी मंच, ग्रामपंचायत चौके आणि ग्रामस्थांकडून बेरू खरात याची सैन्यात अग्नीवीर म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.